रेमडेसिवीर इंजेक्शनचे दर महाराष्ट्र सरकारकडून निश्चित; खाजगी रुग्णालयात 'या' किंमतीत होणार उपलब्ध
कोरोना बाधितांवर उपचारासाठी वापरले जाणारे रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांना वाजवी दरात उपलब्ध व्हावे यासाठी सरकारकडून दर निश्चित करण्यात आले आहेत.
कोरोना बाधितांवर उपचारासाठी वापरले जाणारे रेमडेसिवीर इंजेक्शन (Remdesivir Injection) रुग्णांना वाजवी दरात उपलब्ध व्हावे यासाठी सरकारकडून दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता खाजगी रुग्णालयातील (Private Hospital) रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन 2360 रुपयांना उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे आता जिल्ह्यात किमान एक औषध केंद्र निश्चित करण्यात आले असून राज्यात एकूण 59 औषध केंद्रांची सोय करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयांमुळे रुग्णांची लूट आणि गैरसोय टाळणे शक्य होईल. (Remdesivir Effect: कोविड-19 रुग्णांवर रेमडेसिवीर औषधाचा अत्यल्प परिणाम- WHO)
यापूर्वी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मास्कच्या किंमती सरकारकडून निश्चित करण्यात आल्या होत्या. सरकारच्या या निर्णयानंतर एन 95 मास्क 19 ते 49 रुपयांना तर दुपदरी आणि तीनपदरी मास्क केवळ 3-4 रुपयांना उपलब्ध होणार आहेत. (पहा, मास्कच्या नव्या किंमती)
MAHARASHTRA DGIPR Tweet:
खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना रेमडेसिवीर इंजेक्शन वाजवी किंमतीत मिळावे यासाठी शासनाकडून त्याचे दर निश्चित. हे इंजेक्शन २३६० रुपयांना उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान एक औषध केंद्रही निश्चित. राज्यात ५९ औषध केंद्र झाली निश्चित. pic.twitter.com/H5ojmLBwk6
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 23, 2020
मार्च महिन्यापासून कोरोना व्हायरसचे संकट राज्यावर घोंगावत आहे. या काळात कोविड-19 संसर्गाचे प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. गेल्या काही काळापासून कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, कोरोना संकटकाळात औषधे, मास्कचा काळाबाजार, हॉस्पिटल्समधून होणारी रुग्णांची लूट अशा विविध घटना समोर आल्या. यावर वेळोवेळी ठोस पाऊल उचलणाऱ्या प्रशासनाचा औषध दर निश्चितीचा निर्णय देखील महत्त्वपूर्ण आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 16,32,544 वर पोहचला असून त्यापैकी 14,45,103 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1,43,922 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 43,015 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. सणासुदीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 24, 2020 12:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

