महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019: रासप च्या 'या' उमेदवाराने जेलमधून निवडणूक लढवत मिळवला विजय

पण त्यातील एका निकाल ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. तो म्हणजे कारागृहात असलेला एका उमेदवार या निवडणुकीत विजयी ठरला आहे.

Ratnakar Gutte (Photo Credits: Facebook)

विधानसभा निवडणुकांचे सर्वच निकाल आता जवळपास लागले आहेत. पण त्यातील एका निकाल ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. तो म्हणजे कारागृहात असलेला एका उमेदवार या निवडणुकीत विजयी ठरला आहे.

परभणीच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे हे निवडणूक लढवत होते आणि त्यांनी जेलमधूनच हा विजय मिळवला आहे. रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड शुगरचे चेअरमन तथा उद्योजक आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेऊन त्यांची फसवणूक केली असल्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आणि याच गुन्ह्यांतर्गत ते गेल्या चार महिन्यांपासून परभणीच्या जेलमध्ये आहेत. आणि म्हणूनच त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती ती म्हणजे त्यांच्या नातेवाईकांनी. त्यांचे जावई राजाभाऊ फड व जनसंपर्क अधिकारी हनमंत लटपटे हे रत्नाकर यांचा प्रचार करत असत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019 Live Updates

रत्नाकर गुट्टे यांनी शिवसेनेचे विशाल कदम यांचा 18 हजार 896 मतांनी पराभव केला आहे. तसेच त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुसुदन केंद्रे आणि अपक्ष उमेदवार संतोष मुरकुटे आणि सीतीराम घनदाट निवडणूक लढवत होते.

रत्नाकर गुट्टे हे रासपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि मुख्य म्हणजे रासप हा महायुतीतील घटक पक्ष असून देखील गंगाखेडची जागा शिवसेनेकडे देण्यात आली. त्यानुसार शिवसेनेने विशाल कदम यांना उमेदवारी दिली होती. याचा विरोध करत रासपचे अध्यक्ष महादेव जानकार यांनी भाजपावर टीका केली आणि गंगाखेडमधून रत्नाकर गुट्टे यांना उमेदवारी जाहीर केली होती.