पोलिस कर्मचारी, अधिकार्‍यांनी बदलीनंतर 'सत्कारसोहळे' करणं टाळा - पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे आदेश

पोलिस दलाच्या प्रमाणित कार्यपद्धतीला अनुसरून हे सत्कार सोहळे नसल्याचे सांगत ते टाळण्याचे आदेश पोलिस महासंचालक शुक्ला यांनी राज्यातील पोलिसांना दिले आहेत.

Rashmi Shukla (PC - Twitter/@LiveLawIndia)

एका पोलिस स्टेशन मधून दुसर्‍या पोलिस स्टेशन मध्ये बदली म्हणून जाणार्‍या पोलिस अधिकार्‍यांच्या निरोप सोहळ्यांची रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी गंभीर दखल घेतली आहे. खाकी गणवेशावर रंगीत फेटे बांधणे, पुष्पवर्षाव, किंवा या अधिकाऱ्याला सरकारी वाहनात बसवून ते वाहन दोऱ्या बांधून ओढण्याचे काही प्रकार फोटोज, व्हिडिओज च्या माध्यमातून सोशल मीडीयातून समोर आले आहेत. प्रसिद्धी मिळवण्याच्या अशा प्रकारांची पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आता दखल घेत हे सोहळे बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

अनेकदा मुंबईसह महाराष्ट्र पोलिस दलात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची देखील विशिष्ट कालावधीनंतर बदली केली जाते. यामध्ये आता काही अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी सत्कारसोहळा आयोजित केले जातात. जणू संबंधित अधिकारी पोलिस दलातून सेवानिवृत्तच होत आहे, अशा पद्धतीने हे कार्यक्रम रंगतात. त्याचे रिल्स, फोटोज, व्हिडिओज बनवले जातात. आपली प्रतिमा किती चांगली आहे हे भासवण्याचा त्यामागील उद्देश असतो. त्यासाठी गीत फेटे बांधणे, फुलांचा वर्षाव करणे आणि या अधिकाऱ्याचे सरकारी वाहन दोरी बांधून ओढत नेणे असे प्रकार दिसून आले आहेत. आता हे सोहळे थांबवण्याचे आदेश पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिले आहेत.

पोलिस दलाच्या प्रमाणित कार्यपद्धतीला अनुसरून हे सत्कार सोहळे नसल्याचे सांगत ते टाळण्याचे आदेश पोलिस महासंचालक शुक्ला यांनी राज्यातील पोलिसांना दिले आहेत. अशा प्रकारचा कोणताही कार्यक्रम होणार नाही याची दक्षता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे त्यांनी आदेशात नमूद केले आहे.

निरोप समारंभाचे व्हिडिओ प्रसिद्धी मिळवण्यासाठी असले तरीही यातून प्रसिद्धी कमी आणि चेष्टा, उपहासच अधिक होतो. काही दिवसांपूर्वीच रश्मी शुक्ला यांनी पत्र लिहित जनतेचा पोलिसांवरील विश्वास कमी झाल्याची बाब कबुल केली होती. त्यानंतर मागच्या गोष्टी मागे सोडून देत आता तो पुन्हा नव्याने मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता सुनिश्चित करणे हे प्राधान्य आहे. असेही त्यांनी म्हटलं आहे.