Ramdas Athawale लोकसभा लढविण्याची इच्छा, दोन मतदारसंघावर डोळा
त्यासाठी त्यांनी शिर्डी आणि सोलापूर या दोन मतारसंघावर लक्ष केंद्रीत केल्याचे समजते.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) हे आगामी लोकसभा निवडणूक 2024 लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्या दृष्टीने त्यांनी हालचाली सुरु केल्या आसून त्यांचा महाराष्ट्रातील दोन लोकसभा (Lok Sabha Election 2024) मतदारसंघावर डोळा असल्याची चर्चा आहे. नुकतीच त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा केल्याचेही समजते. या चर्चेच्या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही. मात्र, आठवले यांचा शिर्डी आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले आहे. त्यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भेटीगाठीही सुरु केल्या आहेत.
रामदास आठवले यांनी या आधीही शिर्डी लोकसभा मतदारसंघातून 2009 मध्ये निवडणूक लढवली. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्या वेळी त्यांचा पराभव राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय ठरला होता. तत्कालीन काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळेच आरपीआय आठवले गटाचा सर्वेसर्वा असलेल्या या नेत्याचा पराभव झाल्याचे तेव्हा बोलले जात होते. दरम्यान, पुढच्या काहीच काळात त्यांनी भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केली. पुढे 2014 मध्ये ते भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेवर निवडून गेले आणि केंद्रात मंत्रीही झाले.
मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी आठवले यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. या वेळी त्यांनी शिर्डीतून आपला पराभव झाला त्यामुळे आतापर्यंत शिर्डीचा विकास होऊ शकला नसल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे आपण पुन्हा एकता या जागेवरुन निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, आपण शिर्डीसाठी इच्छूक आहोत. मात्र, सोलापूरची जागा मिळाली तरिसुद्धा ती जागा लढविण्यास रिपाईं तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा केली आहे. एनडीएतील सर्व घटकपक्षांसी चर्चा करुन ही जागा मिळाल्यास आपण ती लढविण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक वाटा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर गोंधळ घालून ठेवला आहे की, सामान्य नागरिकामध्ये संभ्रम आहे. एका बाजूला महाविकासआघाडी. तर दुसऱ्या बाजूला भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशी महायुती आहे. यात आठवले यांच्या पक्षाला कसे स्थान मिळते याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.