'गो कोरोना' च्या घोषणांमुळे महाराष्ट्रात Corona Virus चे रुग्ण कमी, आता महाविकास आघाडीला सुद्धा गो म्हणणार: रामदास आठवले
तसेच गो कोरोना घोषणांचा प्रभाव पाहता आता मी महाराष्ट्रातून गो महाविकास आघाडी अशा सुद्धा घोषणा देणार आहे असेही आठवले यांनी सांगितले आहे.
मुंबई (Mumbai), पुणे (Pune) पाठोपाठ आता ठाण्यात (Thane) सुद्धा कोरोना व्हायरसची लागण झालेला रुग्ण आढळल्याने राज्यभरात एकच खळबळ माजली आहे, कोरोना (Corona Virus) पसरू नये यासाठी अनेक शाळा- कॉलेजेसना सुट्टी देण्याचा विचार सुरु आहे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात येत आहे, अशात कोरोनाला रोखण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी गो कोरोनाच्या (Go Corona) घोषणा दिल्या होत्या. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता, यावरून अनेकांनी त्यांनी ट्रोल सुद्धा केले होते, या साऱ्यावर काल (गुरुवारी) उत्तर देताना, रामदास आठवले यांनी आणखीन एक विचित्र दावा केला आहे, आपल्या गो कोरोनाच्या घोषणांमुळेच महाराष्ट्रात कोरोनाचे कमी रुग्ण आहेत असे आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच गो कोरोना घोषणांचा प्रभाव पाहता आता मी महाराष्ट्रातून गो महाविकास आघाडी अशा सुद्धा घोषणा देणार आहे असेही आठवले यांनी सांगितले आहे. राज्यसभेच्या उमेदवारीचा दाखल केल्यावर आठवले पत्रकारांशी बोलत होते. Corona virus: कोरोना व्हायरस हटवण्यासाठी रामदास आठवले यांनी अवलंबला 'हा' अनोखा उपाय (Watch Video)
रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ट्रोलर्सचा समाचार घेतला, कोरोनासारखा गंभीर आजार पसरत असताना गो कोरोना नाही तर काय कम कोरोना म्हणू का? मी असे कधीही करणार नाही, आणि देशातून जोपर्यंत कोरोना जात नाही तोपर्यंत मी या घोषणा देतच राहीन असं मत आठवले यांनी व्यक्त केले आहे. तसेच, आपण कोरोनाला जायला सांगितलं असलं तरीही यासाठी आपणही काळजी घ्यायला हवी, आपल्या गावातील, शहरातील, राज्यातील कोणत्याही व्यक्तीला आजार होऊ नये यासाठी स्वच्छता बाळगणे आवश्यक आहे, डॉक्टरांशी सुद्धा याबाबत संवाद साधयला हवा असेही आठवले म्हणाले.
दरम्यान, आठवले यांच्या गो कोरोना या घोषणांची सोशल मीडियावर अजूनही चर्चा आहे. मुंबई मध्ये चीनी नागरिकांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आठवले यांनी ‘गो करोना… गो… गो करोना… गो’ अशा घोषणा दिल्या होत्या, त्यांच्या पाठोपाठ उपस्थित नागरिक आणि चीनचे भारतातील काऊन्सील जनरल तांग गुइलाई यांनीही या घोषणा दिल्या होत्या.