Virar Hospital Fire: विरार दुर्घटनेबाबत केलेल्या वक्तव्याबाबत राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

या आगीत 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Rajesh Tope (Photo Credit: Twitter)

विरारमधील (Virar) विजय वल्लभ रुग्णालयामध्ये (Vijay Vallabh COVID Care Hospital) आज (शुक्रवार, 23 एप्रिल) पहाटेच्या सुमारास आग (Fire) लागली होती. या आगीत 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी ही दुर्घटना राज्य सरकारच्या अंतर्गत बाब असून राष्ट्रीय स्तरावरील बातमी नसल्याचे म्हटले होते. राजेश टोपे यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे. याच वक्तव्याबाबत राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच शब्दाचा विपर्यास करू नये, अशी विनंती त्यांनी प्रसार माध्यमांना केली आहे.

"माध्यमांसह राज्यातील जनतादेखील मला पाहत आहे. मी नेहमीच माझ्यावर आलेल्या दु:खांपेक्षा माझी कर्तव्य आणि जबाबदारीला महत्व दिले आहे. मी अत्यंत संवेदनशीलतेने काम करणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही मला आजच पाहात आहात असे नाही, वर्षभरापासून कोविड काळात देखील पाहात आहात. तसेच विरार येथे घडलेल्या घटनेवर सर्वप्रथम प्रतिक्रिया देणारा मीच होतो. ही अत्यंत दुर्देवी घटना असून या घटनेत मरण पावलेल्या लोकांच्या परिवारांच्या दुखात आम्ही सहभागी आहोत. या परिस्थिती शासनाकडून जी काही मदत करता येईल, ते आम्ही करणार आहोत. या सगळ्या गोष्टींची कडक तपासणी होईल. ज्या ठिकाणी निष्काळजीपणा आढळून येईल, तिथे कारवाई होईल. मात्र, शब्दाचा विपर्यास करू नये, एवढीच माझी माध्यमांना विनंती राहील.” असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Virar Hospital Fire Incident: विरार च्या Vijay Vallabh COVID Care Hospital आग प्रकरणाची चौकशी केली जाणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

या दुर्घटनेत मरण पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रत्येकी 2 लाखांची मदत केली जाणार आहे. तर, जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली जाणार आहे. तर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची आणि जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, वसई-विरार महापालिकेकडूनही मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.