'लवकर बरे व्हा' - अरूण जेटली यांच्या प्रकृतीवर Raj Thackeray चं ट्विट!
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून खास संदेश शेअर केला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली (Arun Jaitley) काही दिवसांपूर्वी वैद्यकीय चाचणीसाठी अमेरिकेला रवाना झाले आहे. 'द वायर' ने दिलेल्या माहितीनुसार अरूण जेटलींना कॅन्सर (Cancer) असल्याचं वृत्त देण्यात आलं आहे. मात्र यावृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र अचानक अरूण जेटली अमेरिकेला रवाना झाल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. सामान्य नागरिकांपासून अनेक राजकीय मंडळींनी हे वृत्त समजताच अरूण जेटलींच्या आरोग्यासाठी प्रार्थना आणि आजारातून लवकर बाहेर पडण्याबाबत संदेश शेअर केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून खास संदेश शेअर केला आहे.
राज ठाकरे यांचे ट्विट
राज ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये, जेटली जी, तुमच्या प्रकृती अस्वस्थेबद्दल ऐकून अस्वस्थ वाटतयं, माझ्या शुभेच्छा आणि प्रार्थना तुमच्यासोबत आहेत. आजारपणावर मात करून तुम्ही लवकर बाहेर पडाल असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
राजकीय मतभेद विसरून राज ठाकरेंच्या पूर्वी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील ट्विटरच्या माध्यामातून अरूण जेटलींना आजारावर मात करण्यासाठी मी आणि कॉंग्रेस पक्ष 100 % तुमच्यासोबत आहे अशा आशयाचे ट्विट केले होते.
1 फेब्रुवारी 2019 रोजी यंदाच्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. केंद्रीय मंत्री या नात्याने अरूण जेटली तो मांडणार आहेत मात्र उपचार घेऊन पुढील 15 दिवसांत अरूण जेटली भारतामध्ये परतणार का? याबाबत अजूनही कोणती माहिती देण्यात आलेली नाही. ऑगस्ट 2018 मध्ये अरूण जेटली यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.