भारत 'आयसीयू'त, निवडणुकीनंतरच शुद्धीवर येईल ; व्यंगचित्रातून राज ठाकरे यांची बोचरी टीका

आता पुन्हा एकदा व्यंगचित्रातून राज यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे (Photo Credit : PTI)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रांनाद्वारे टीका करण्याचा सपाटाच लावला आहे. आता पुन्हा एकदा व्यंगचित्रातून राज यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. "गेल्या साडे चार वर्षात भारतावर खूपच अत्याचार झाल्याने तो आयसीयूत पोहचला आहे. लोकसभा निवडणुकीनंतरच आता तो शुद्धीवर येईल," अशी बोचरी टीका राज यांनी व्यंगचित्रातून केली आहे.

राज ठाकरे दिवाळी निमित्त व्यंगचित्रांची मालिका घेऊन येत आहेत. याची माहिती खुद्द राज यांनी ट्विटरद्वारे दिली. दिवाळीच्या पाच दिवासांवर आधारित ही मालिका असणार आहे. आज धनत्रयोदशी निमित्त त्यांनी हे व्यंगचित्र शेअर केले.

वैद्यकीय शास्त्राचा देव धन्वंतरी ह्याचा जन्मदिवस म्हणूनही काही लोक हा दिवस महत्त्वाचा मानतात. याचा संबंध व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी अचूकपणे मांडला आहे.

राज ठाकरेंनी रेखाटलेल्या चित्रात भारत देश आयसीयूत असल्याचे दाखवण्यात आले आहे. तर धन्वंतरी आयसीयू बाहेर येऊन जमलेल्या लोकांना सांगत आहे की, "काळजीचे कारण नाही. गेल्या साडे चार वर्षात त्याच्यावर (भारतावर) खूप अत्याचार झालेत. लोकसभा निवडणुकीनंतर येईल शुद्धीवर."

राज ठाकरेंच्या या व्यंगचित्राला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत असून यावर 200 हून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे.