यवतमाळ: दुष्काळाच्या छायेत दमदार पावसाची अचानक हजेरी, वातावरणात गारवा

शेतीचा हंगाम वाया गेल्यामुळे बळीराजा हैराण आहे. तर, जनावरांनाही चारा मिळणे कठीण झाले आहे.

राज्यभरात ढगाळ वातावरण | (Photo courtesy: archived, edited, representative image)

Rain in Yavatmal District: यवतमाळ (Yavatmal ) जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दमदार पावसाच्या सरी अचानक कोसळल्याने परिसारत गारवा निर्माण झाला. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये दृष्काळी स्थिती (drought Affected District) असल्यामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. शेतीचा हंगाम वाया गेल्यामुळे बळीराजा हैराण आहे. तर, जनावरांनाही चारा मिळणे कठीण झाले आहे. दरम्यान, यवतमाळमध्ये पावसाच्या सरी अचाकनक कोसळल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. आर्णी, घाटंजी, वणी तालुक्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांप्रमाणे यंदा यवतमाळमध्येही पावसाचे प्रमाण कमीच राहिले. परिणामी जिल्ह्यातील शेती धोक्यात आली. दरम्यान, अवकाळी पावसाने शनिवारी यवतमाळमध्ये हजेरी लावली खरी. पण, त्यामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी, दुसऱ्या बाजूला तुर आणि हाती येत असलेल्या कपाशीच्या पिकाला फटका बसल्याचे पाहायला मिळाले. (हेही वाचा, महाराष्ट्रातील दुष्काळ: दुष्काळी जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का? इथे पाहा)

दरम्यान, या आठवड्यात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात तुरळक किंवा हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली होती. गेले दोन, तीन दिवस आकाशात वातावरण ढगाळ होते. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे हे ढग जमा झाल्याचे पुणे वेधशाळेने म्हटले होते. दरम्यान, राज्यभरात बहुतांश ठिकाणी वातावरण ढगाळ असून थंडीचा कडाकाही चांगलाच वाढला आहे.