R R Patil 5th Death Anniversary: रावसाहेब रामराव पाटील अर्थातच महाराष्ट्राचे आर. आर. पाटील उर्फ आबा यांची राजकीय कारकिर्द, निर्णय आणि जीवनपट
आर आर पाटील म्हणजे राजकीय पार्श्वभूमी नसूनही उपमुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारणारे हे दुर्मिळ राजकीय व्यक्तिमत्व. पश्चिम महाराष्ट्र हा सहकाराचा मळा म्हणून ओळखला जात असूनही आणि पश्चिम महाराष्ट्रातले नेते असूनही पाटील यांच्या नावावर एकही सहकारी संस्था नावावर नव्हती किंवा नाही.
RR Patil 5th Death Anniversary: रावसाहेब रामराव पाटील (Raosaheb Ramrao Pati) अर्थातच महाराष्ट्राचे आर. आर. पाटील (R R Patil) उर्फ आबा (Aba). आपल्यातून निघून गेले त्याला आता जवळपास पाच वर्षे होत आली. खरं म्हणजे आबांचं जाण्याचं वय नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे ज्येष्ठ असले तरी तरुण तडफदार नेते होते. त्यांची भाषणं, निर्णय आणि व्यक्तिमत्व जनमानसात प्रचंड प्रसिद्ध होते. खास करुन ग्रामीण भागातील जतना आर. आर. पाटील यांच्यावर प्रचंड प्रेम करत असे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना (Mahatma Gandhi Tanta Mukti Yojana), संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान (Sant Gadge Baba Gram Swachata Abhiyan) , डान्सबार बंदी (Dansbar ban) निर्णय, गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागाचं पालकतत्व यांसारखे आर आर पाटील यांचे अनेक निर्णय प्रचंड यशस्वी आणि लोकप्रियही ठरले. आर आर पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत यश, लोकांच प्रेम मिळाले तसेच त्यांच्यावर प्रचंड टीकाही झाली. खास करुन मुबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यावेळी 'बडे बडे शहरों में.. ऐसी छोटी.. छोटी चिजे होती रहती हैं..' हे त्यांचे वाक्य प्रचंड गाजले. या वाक्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. पण, असे प्रसंग आर आर पाटील यांच्या आयुष्यात फार कमी आले. अशा आर आर पाटील यांचा आज स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीदिनानीमित्त त्यांच्या राजकीय जीवनाचा घेतलेला हा आढावा..
आर आर पाटील राजकीय कारकिर्द
आरआर पाटील यांचे पूर्ण नाव रावसाहेब रामराव पाटील. पण आर आर पाटील या नावाने ते महाराष्ट्राला परिचित. अवघा महाराष्ट्र त्यांना 'आबा' या नावाने ओळखत असे. सांगली जिल्ह्यात असलेल्या तासगाव तालुक्यातील अंजनी हे त्यांचे मूळ गाव. या गावात 16 ऑगस्ट 1957 या दिवशी त्यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण अत्यंत खडतर परिस्थितीत गेले. परंतू, असे असतानाही त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करुन कायद्याची पदवी घेतली. मुळचाच समाजसेवेचा पिंड असल्याने आर आर पाटील यांनी 1979 मध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषद लढवली. जिल्हा परिषद, पंचायत समिती असे काही काळ कार्यरत राहिल्यावर 1990 मध्ये आर. आर. पाटील पहिल्यांदा तासगावचे आमदार म्हणून निवडूण आले. त्यानंतर ते 1990, 1995, 1999, 2004, 2009, 2014 असे सलग 6 वेळा तासगावचे आमदार राहिले.
आमदार म्हणून दमदार कामगिरी
आमदार म्हणूनही आर आर पाटील यांची कामगिरी उत्तम राहिली. 1996 मध्ये त्यांची काँग्रेसचे विधानसभा प्रतोद म्हणून नियुक्ती झाली. 1998 मध्ये ते विधानसभा लोकलेखा समितीचे अध्यक्ष पद भूषवले. 1999 मध्ये ग्रामविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आली. 2004 मध्ये ते पुन्हा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले. पण, 2008 मध्ये मुंबई हल्ल्यावेळी वादग्रस्त विधानामुळे त्यांना मंत्रिपद गमावावं लागले. दरम्यान, 2009 मध्ये त्यांना दुसऱ्यांदा गृहमंत्रीपद मिळालं. 2004, 2009 या काळात त्यांनी राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सांभाळलं.
निर्णयांचा धडाका
आरआर पाटील यांनी ग्रामविकासमंत्री असताना संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, गृहमंत्री असताना महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान यशस्वीपणे राबवलं. तसेच, डान्सबार बंदीचा धाडसी निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी केली. डान्सबार बंदीच्या निर्णयावर प्रचंड टीका होऊनही आबा आपल्या निर्णयावर ठाम राहिले. या निर्णयाप्रमाणेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारण्याचा धाडसी निर्णयही त्यांनी घेतला. पालकमंत्री म्हणून त्यांनी आदिवासींच्या मुलांना दत्तक घेऊन मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. गडचिरोलीच्या विकासकामांना चालना दिली.
आर आर पाटील म्हणजे राजकीय पार्श्वभूमी नसूनही उपमुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारणारे हे दुर्मिळ राजकीय व्यक्तिमत्व. पश्चिम महाराष्ट्र हा सहकाराचा मळा म्हणून ओळखला जात असूनही आणि पश्चिम महाराष्ट्रातले नेते असूनही पाटील यांच्या नावावर एकही सहकारी संस्था नावावर नव्हती किंवा नाही. राजकारणी म्हटले की गेंड्याच्या कातडीचा असा एक शिक्काच. पण, एक संवेदनशील राजकीय नेता अशी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय पातळीवरील मोठे नेते असलेल्या शरद पवार यांचे विश्वासू पाठीराखे अशीही त्यांची ओळख होती. जि.प. सदस्य ते उपमुख्यमंत्री असा खडतर प्रवास करत महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेला राष्ट्रवादीचा स्वच्छ सोज्ज्वळ चेहरा अशीही त्यांची प्रतिमा होती. उत्कृष्ट वक्ता आणि संसदपटू असलेल्या या नेत्याची राजकीय कारकिर्द प्रचंड मोठी होती. पण या कारकिर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)