पुणे जिल्हा परिषद कडून कोरोना संकटात गरजूंना काम मिळावं म्हणून मनरेगा विशेष रोजगार अभियान जाहीर; इथे करा अर्ज!
या मनरेगा योजनेतून काही गरजूंना काम आणि त्याचा मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
सध्या जगभर घोंघावणार्या कोरोना संकटाने अर्थव्यवस्थेलाही धक्का लावला आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मजुरांनी शहरांमधून गावामध्ये स्थलांतर केले आहे. यामध्ये महाराष्ट्र देखील अपवाद नाही. महाराष्ट्रातील शहरांमधूनही अनेकांनी आपापल्या गावचे रस्ते धरले आहेत. मात्र आता ग्रामीण भागातही अर्थव्यवस्थेचे चक्र बिघडलेले असल्याने तात्पुरते काम मिळवून देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेकडून (Pune Zilha Parishad) मनरेगा (MGNREGA) विशेष रोजगार अभियान जाहीर करण्यात आलं आहे. या मनरेगा योजनेतून काही गरजूंना काम आणि त्याचा मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. एका गूगल फॉर्मच्या (Google Form) माध्यामातून इच्छुक उमेदावारांकडून माहिती गोळा केली जाणार आहे. उपलब्धतेनुसार त्याला काम प्रशासनाकडून दिले जाईल.
दरम्यान केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी आर्थिक पॅकेज जाहीर करताना मनरेगा अंतर्गत मजुरांना काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच भत्त्यामध्ये वाढ केली जाणार असल्याची माहिती दिली होती. दरम्यान बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खास ट्वीटच्या माध्यमातून मनरेगा विशेष रोजगार अभियानाची माहिती दिली आहे.
सुप्रिया सुळे ट्वीट
महाराष्ट्रासह जगभरात 24 मार्च पासून कोरोना व्हायरस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशी महत्त्वाची शहरं कोरोना व्हायरस संकटामध्ये रेड झोनमध्ये अडकल्याने या शहरातील सारेच व्यवहार ठप्प पडले आहेत. त्यामुळे मजुरांना मूळ घरी परतण्याचा मार्ग होता. पण अशामध्ये आता ग्रामीण भागात अर्थव्यवस्थेची घडी बसवण्याचं काम प्रशासन आणि राज्य सरकारला करावं लागणार आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय जगात कोरोना व्हायरस संकटाचे अर्थव्यवस्थेवर पडसाद उमटायला सुरूवात झाल्याने मोठ्या आर्थिक मंदीचा धोका देखील वर्तवण्यात आला आहे.