Pune Water Supply News: पुण्यात गुरुवारचा ‘पाणी बंद’चा निर्णय अखेर मागे, नागरिकांना दिलासा

या पुण्यातील पाणी बंदच्या संदर्भात अनेक नागरिकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर महापालिकेने हा निर्णय मागे घेतला आहे.

Water Cut | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

पुणेकरांना एक आनंदाची बातमी आहे. येत्या गुरुवारी शहरातील (Pune City) काही भागात पाणी बंद करण्याचा निर्णय महापालिकेकडून मागे घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील पर्वती उपकेंद्र येथे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार होते. त्यामुळे पुणे महापालिकेने गुरुवारी पर्वती जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी पंपींग व वडगाव जलकेंद्र यांच्या अंतर्गत येणाऱ्या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असे जाहीर केले होते. मात्र महानगर पालिकेकडून हा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  (हेही वाचा - Mumbai Crime: दादर रेल्वे स्थानकावर महिलेले चालत्या ट्रेनमधून फेकुन दिले, आरोपीला अटक)

या पुण्यातील पाणी बंदच्या संदर्भात अनेक नागरिकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर महापालिकेने हा निर्णय मागे घेतला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेने पाणीकपातीचा निर्णय मागे घेतला होता. महापारेषण कंपनीने विद्युतविषयक देखभाल-दुरुस्तीची कामे काढली. त्यामुळे जलकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित होणार असल्याने शहराच्या बहुतांश भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल, असे महापालिकेने जाहीर केले होते. आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

दरम्यान, जून, जुलै महिन्यांत खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणे 90 टक्के भरली आहेत. त्यामुळे पुणेकरांची वर्षभर पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.