Pune Rain News: पुणे - पिंपरीत पाणीच पाणी, अनेक भागातील वीजपुरवठा बंद

घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याची शक्यता वाढल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

पुणे शहरात मुसळधार पाऊस हा सुरु असून धरणातून मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग हा सुरु आहे. पुणे, पिंपरी शहर तसेच खेड, मावळ व आंबेगाव तालुक्यातील सुमारे 3050 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करून ठेवण्यात आला आहे. पिंपरीमध्ये संजय गांधीनगर आणि पिंपरी कॅम्पमध्ये 400 वीजग्राहकांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.  आंबेगाव तालुक्यात डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पंचाळे खुर्द व वचपे या गावामध्ये भूस्खलन होत आहे. तेथील नागरिकांचा स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच वीजसुरक्षेच्या दृष्टीने तेथील सुमारे 15 ग्राहकांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. (हेही वाचा - Pune Weather Forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!)

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 35002 क्युसेक्स विसर्ग वाढवून तो सायंकाळी 05:00 वा. 45705 क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी, अशी माहिती देण्यात आली आहे. हवामान खात्याने पुण्यात आज रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या धरणक्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम आहे. घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याची शक्यता वाढल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे. अशातच मावळ तालुक्यातील तिकोणा (वितंगगड)किल्ल्याचा काही भाग कोसळल्याची घटना घडलीआहे. मात्र, दरड कोसळल्यानंतर सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पायथ्याशी असणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.