Pune Railway Division 9 Hours Block: मध्य रेल्वेच्या पुणे विभागात 13 सप्टेंबरला नऊ तासांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून १३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत नऊ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असून यामुळे पुणे-लोणावळा, पुणे-दौंड मार्गावरील काही लोकल गाड्या तसेच डेक्कन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून 13 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नऊ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत पुणे जंक्शनवरील फलाट क्रमांक 1 वरील तीनही मार्ग बंद ठेवण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता असून, अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या 13 सप्टेंबरला आयोजित ब्लॉकची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. फलाट क्रमांक 1 वरील देखभाल किंवा तांत्रिक कामांमुळे हा ब्लॉक घेण्यात येत असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
पुणे ब्लॉक दरम्यान कोणत्या गाड्या रद्द होणार?
पुणे रेल्वे विभागाच्या 9 तासांच्या या ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि लोणावळा तसेच पुणे आणि दौंड दरम्यान धावणाऱ्या काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय पुणे-मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन एक्सप्रेसही या दिवशी रद्द करण्यात आली आहे.
काही गाड्यांचा मार्ग बदलणार
पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस १३ सप्टेंबर रोजी खडकी येथून सुरू आणि समाप्त होणार असून, ती सकाळी ५.५५ वाजता खडकीहून सुटणार आहे. तर जम्मू तावी-पुणे एक्सप्रेस ११ सप्टेंबर रोजी हडपसर येथेच थांबवण्यात येणार आहे, म्हणजेच ही गाडी पुण्यापर्यंत न जाता हडपसर येथेच संपुष्टात येणार आहे. नक्की वाचा: Pune Metro Timings In Ganpati: गणेशोत्सवात पुणे मेट्रोच्या सेवेत वाढ, अनंत चतुर्दशीला 41 तास अखंड धावणार गाड्या .
ब्लॉक का घेतला जातोय?
पुणे-दौंड विभागातील पुणे यार्डमध्ये डी.डी.एस. पॉईंटचे उन्नतीकरण करण्यात येणार असून, यासाठीच हा ब्लॉक घेण्यात येत आहे. या कामांतर्गत जुन्या रेल्वे रुळांच्या जागी अधिक क्षमतेचे ६० किलो वजनाचे नवे रेल्वे रूळ बसवले जाणार आहेत. या दुरुस्ती व उन्नतीकरणाच्या कामासाठी विशेष वाहतूक ब्लॉक तसेच वीज ब्लॉकही घेतला जाणार आहे.
ब्लॉकच्या कालावधीत फलाट क्रमांक 1, अप मेन लाईन आणि सीएसएमटी टोकाकडील डाऊन मेन लाईनवरील गाड्यांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळेच या मार्गांवरून धावणाऱ्या काही लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम होऊन त्या रद्द करण्यात आल्या आहेत किंवा त्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या मते, हे उन्नतीकरणाचे काम भविष्यात रुळांची क्षमता वाढवण्यासाठी आणि वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत करण्यासाठी महत्त्वाचे आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पुणे यार्डमधील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 11, 2026 11:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

