Pune New Year 2025 Celebration: पुण्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 40 सेलिब्रेशन स्पॉट्स; 3,000 पोलीस आणि 700 वाहतूक कर्मचारी तैनात, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

अंदाजे 23 ठिकाणे ही ड्रंक ड्रायव्हिंग झोन म्हणून ओळखले गेले आहेत. एक समर्पित टीम त्यांच्यावर लक्ष ठेवेल. पब, रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि परवानाधारकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Pune Police | (Photo Credits: ANI)

Pune New Year 2025 Celebration: पुण्यातील (Pune) नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी (New Year 2025) पुणेकर दरवर्षी पब आणि शहरातील रस्त्यांवर गर्दी करतात. यावेळी दारू पिऊन गाडी चालवणे, रॅश ड्रायव्हिंग, ध्वनी प्रदूषण, अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे यासारख्या अनेक समस्या उद्भवतात. परिणामी रस्त्यांवरील गर्दी वाढून काही अनुचित प्रकारही घडण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलीस दरवर्षी चोख बंदोबस्त ठेवतात. यंदाही नवीन वर्षाचे स्वागत सुरळीत पार पडावे म्हणून पुणे पोलिसांनी कडक व्यवस्था केली आहे.

सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘31 डिसेंबर आणि 1 जानेवारी 2025 या दिवसांसाठी, सार्वजनिक सुरक्षा आणि नववर्षाचे स्वागत सुरळीत पार पडावे यासाठी सुमारे 3,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. रिस्क झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक ठिकाणी 700 वाहतूक पोलीस कर्मचारी कार्यरत असतील. रॅश ड्रायव्हिंग, ट्रिपल सीट किंवा चुकीच्या बाजूने ड्रायव्हिंग इत्यादी सारख्या वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.’

ते पुढे म्हणाले, ‘एकूण 40 ठिकाणी उत्सवासाठी परवानगी देण्यात आली आहे. अंदाजे 23 ठिकाणे ही ड्रंक ड्रायव्हिंग झोन म्हणून ओळखले गेले आहेत. एक समर्पित टीम त्यांच्यावर लक्ष ठेवेल. पब, रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि परवानाधारकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ग्राहकांवर कठोर कारवाई केली जाईल. पब आणि बारमध्ये, जर कोणी अल्पवयीन मद्य सेवन करताना आढळले तर मालकाला त्यांचा परवाना रद्द करावा लागेल,’ (हेही वाचा: Guidelines For New Year Celebrations In Mumbai: मुंबईकरांनो लक्ष द्या! पोलिसांकडून 31 डिसेंबरच्या रात्रीसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि निर्बंध जारी)

दुसरीकडे, मुळशी, लोणावळा, पौड, भुगाव आणि वेल्हे यांसारखी लोकप्रिय ठिकाणीही लोक सेलिब्रेशन जातात. ही ठिकाणे पुणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत येत असल्याने शहर पोलिसांबरोबरच ग्रामीण पोलिसांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची ठरते. पुणे ग्रामीण एसपी पंकज देशमुख यांनी सांगितले की, ‘31 डिसेंबर रोजी येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात आणि त्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. मी सर्व पर्यटकांना जबाबदारीने उत्सव साजरा करण्याचे आणि बेकायदेशीर कामांपासून दूर राहण्याचे आवाहन करतो. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या गुन्ह्यांवर जिल्हा प्रशासन कठोर कारवाई करेल.’