Satta Matka King: पुण्यात मटका किंग नंदू नाईक च्या अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी; 8 जण अटकेत
यावेळी कल्याण ओपन मटक्याच्या चिठ्ठ्या सापडल्या
मटका (Matka) या जुगाराच्या एका प्रकाराला देशात बंदी असताना पुण्यात त्याचा सुळसुळाट आहे.पुण्यातील याच्या शिवाजी रोड वरील जनसेवा बिल्डिंग मधील अड्यावर छापा टाकून सुमारे 8 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम आणि जुगाराचे काही साहित्य जप्त करण्यात आले आहे. हा एकूण 2 लाख 11 हजारांचा ऐवज आहे. पोलिसांनी यापूर्वीही नंदू नाईकच्या (Nandu Naik) अड्ड्यांवर छापेमारी केली होती. मात्र काही दिवसांनी तो पुन्हा सक्रिय झाला होता.
पुण्यात गुन्हे शाखेच्या युनिट 1 चे पोलिस हवालदार त्रिंबक बामगुडेंनी खडक पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दिली होती. त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी 8 जणांना काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. हा नंदकुमार नाईक पुण्यामध्ये मटका किंग नावाने ओळखला जातो. त्याचे शहरात अनेक अड्डे आहेत. शुक्रवार पेठेमध्ये जनसेवा भोजनालय मागे मटक्याचा अड्डा होता तेथेच पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली आहे. नक्की वाचा: Kalyan Satta Matka Mumbai: मुंबई चा कल्याण मटका काय असतो? कशी झाली त्याची सुरूवात.
वरिष्ठ पोलिसांना मटक्याच्या अड्ड्याची माहिती दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट 1, 2 च्या अधिकार्यांना कारवाईचे आदेश दिले होते. पोलिसांनी त्यानंतर शिवाजी रोडवरील जनसेवा बिल्डिंग मध्ये छापा टाकला. यावेळी कल्याण ओपन मटक्याच्या चिठ्ठ्या सापडल्या. आरोपींकडून 95,740 रोख रक्कम आणि जुगाराच्या वस्तू मिळून 2 लाख 11 हजारांचा माल सापडला.