पुणे येथील 'बर्गर किंग'च्या बर्गरमध्ये सापडल्या काचा, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज रोड वरील बर्गर किंगच्या आउटलेट मध्ये एका ग्राहकाच्या बर्गरमध्ये काचांचे तुकडे आढळल्याने ग्राहकाला गंभीर जखम झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.

(Photo Credits: Burger king)

पुणे: फर्ग्युसन कॉलेज (Fergusan College) जवळील गोखले मार्गावर स्थित बर्गर किंग (Burger King) च्या एका बर्गरमध्ये चक्क काचांचे तुकडे सापडल्याने ग्राहकाला गंभीर जखम झाली अशी तक्रार शनिवारी डेक्कन पोलीस (Deccan Police)  ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर बर्गर किंग चे मॅनेजर, स्टोअर मॅनेजर व सुपरवायजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सजीत पठाण या ग्राहकाच्या बर्गरमध्ये असलेल्या काचा खाल्ल्याने त्यांना जखम झाली होती त्यांनतर त्यांना काही दिवस आयसीयू मध्ये ठेवण्यात आले होते मात्र आता त्यांची परिस्थती सुधारली असून त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स मिळाल्यानंतर आउटलेटवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचे तपास अधिकारी दीपक लगड यांनी IANS ला सांगितले.

सजीत पठाण हे 31 वर्षीय रिक्षाचालक आपल्या मित्रांसोबत बर्गर खाण्यासाठी या बर्गर किंगच्या आउटलेटमध्ये गेले होते. त्यावेळी अचानक सजीत यांना घशात काहीतरी अडकल्याचं जाणवलं म्हणून खोकायला लागल्यास तोंडातून रक्त येऊ लागलं यानंतर त्यांच्या मित्रांनी बर्गर तपासून पाहिल्यावर त्यात काचेचे तुकडे आढळून आले. या प्रसंगानंतर सजीत यांना तात्काळ रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. धक्कादायक : मंदिरातील प्रसाद खाल्ल्याने 13 जणांचा मृत्यू; जाणूनबुजून विषबाधा केल्याचा अंदाज

 

डॉक्टरांच्या माहितीनुसार काच खाल्ल्याने सजीत यांच्या घश्याला व पोटाला जखम झाल्याने त्यांची प्रकृती बिकट होती म्हणून काही दिवस त्यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आले होते. या एकूण प्रकरणात रुग्णालयाचे बिल भरण्यात सजीत यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

बर्गर किंगच्या विरोधात सजीत यांच्या मित्रांनी केलेल्या तक्रारी नंतर पोलिसांनी आउटलेट मधील सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासून पहिले ज्यामध्ये संपूर्ण प्रसंगाचे रेकॉर्डिंग सापडले असले तरी बर्गर मध्ये काचांचे तुकडे आढळल्याचे कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत. दरम्यान प्राथमिक माहितीच्या आधारे, आउटलेटवर आयपीसी अंतर्गत कलाम 377 नुसार जीवाला धोका पोह्चव्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.