पुणे: कोंढवे-धावडे गावाचा चीनी वस्तूंच्या खरेदी-विक्रीवर बहिष्कार घालण्याचा संकल्प

कोरोना व्हायरस आणि गलवान खोऱ्यातील झटापट यामुळे चीनबद्दलचा द्वेष अधिकच वाढला आणि त्यातूनच चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरु लागली.

Representational Image | (Photo Credits: ANI)

देशात अनेक ठिकाणी चीनी वस्तूंकडे पाठ फिरवली जात आहे. सोशल मीडियावर देखील #BoycottChina ही मोहिम सुरु आहे. यात अनेक संस्था, लोक सहभागी झाले आहेत. त्यात आता पुण्यातील एका गावाची भर पडली आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातील कोंढवे-धावडे (Kondhve-Dhavade) या गावाने देखील चीनी वस्तूंच्या खरेदी-विक्रीवर बहिष्कार घालण्याचा संकल्प केला आहे. 1 जुलै पासून या निर्णयाची अंमलबजावणी पूर्ण गावांत होणार आहे. (महाराष्ट्र सरकारकडून चीनी कंपन्यांना तिसरा झटका! चीन सोबत होणारे 5000 कोटींचे 3 प्रोजेक्ट्स थांबवले)

ग्रामपंचायतीच्या बैठकीत हा संकल्प घेण्यात आला आहे. त्यानंतर गावातील एकही दुकानदार चायनीज प्रॉडक्ट विकणार नाही. तसंच गावातील एकही व्यक्ती चायनीज प्रॉडक्ट विकत घेणार नाही, असे ठरवण्यात आले. यासंदर्भात ग्रामपंचायतीने एक परीपत्रक जारी केले असून ते गावातील सर्व दुकानदारांना देण्यात आले आहे. (Boycott Of Chinese Goods: चीनी प्रोडक्ट्सवर बॉलिवूडसह क्रिडा क्षेत्राने बहिष्कार टाकण्याचे CAIT यांचे आवाहन)

ANI Tweet:

कोंढवे-धावडे गावाचे संरपंच नितीन धावडे यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, "चायनीज प्रॉडक्टच्या खरेदी-विक्रीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय हा महिन्याच्या बैठकीत घेण्यात आला. या संदर्भात आम्ही ग्रामपंचायतीच्या कॉन्ट्राक्टर्संना माहिती दिली आहे. तसंच करारामध्ये देखील या गोष्टी नमूद केल्या जातील. आम्ही गावातील लोक आणि दुकानदार यांना चायनीज प्रॉडक्टच्या खरेदी-विक्रीवर बंदी घालण्याचे सांगितले आहे. तरी देखील गावात याबद्दल माहिती देणारे पोस्टर आणि बनर्स लावण्यात येतील."

कोरोना व्हायरसचा उगम चीनमध्ये झाला आणि त्यानंतर या विषाणूचा प्रसार जगभरात होत आहे. भारतातही कोरोना व्हायरसमुळे अतिशय गंभीर परिस्थिती ओढावली. त्यामुळे चीनबद्दल चीड देशवासियांच्या मनात होती. त्यातच गलवान खोऱ्यात चीनी सैन्यासोबत झालेल्या झटापटीत भारताला आपले 20 जवान गमवावे लागले. त्यामुळे चीनबद्दलचा द्वेष अधिकच वाढला आणि त्यातूनच चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरु लागली.