पुणे: दोन्ही कोरोनाग्रस्त रूग्णांची प्रकृती स्थिर, नागरिकांना दक्षता घेण्याचं विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांचे आवाहन
दरम्यान कोणालाही कोरोनाची लक्षणं आढळल्यास त्यांना नायडू रूग्णालयात पाठवण्याचेही आवाहन यावेळी करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्रामध्ये काल (9 मार्च) दिवशी पुण्यात दोन जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आणि आता पुण्यामध्ये कोरोना व्हायरस बाबतची दहशत वाढली आहे. दरम्यान आज (10 मार्च) पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन रुग्णांपैकी एकामध्ये कोरोना ची सौम्य लक्षणे आहेत तर दुसऱ्या रुग्णात कोणतीही लक्षणे आढळलेली नाही. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि ठिकाणांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांचेही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान महापालिकेच्या नायडू रूग्णालयामध्ये कोरोनाग्रस्तांना दाखल करण्यात आले आहे. कोरोना वायरस बाधित दोन रुग्ण महाराष्ट्रात आढळले, पुणे येथील नायडू रुग्णालयात उपचार सुरु.
पुण्यात कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेची रूग्णालयं सज्ज ठेवण्यात आली आहेत. सोबतच डॉक्टरांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून परदेशातून भारतात आलेल्यांची वेगळी नोंद ठेवावी असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान कोणालाही कोरोनाची लक्षणं आढळल्यास त्यांना नायडू रूग्णालयात पाठवण्याचेही आवाहन यावेळी करण्यात आलेले आहे. राज्यात कोरोनाचे दोन रूग्ण सापडले असले तरीही घाबरून जाऊ नका, दक्षता घ्या असं आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान पुण्यात कोरोनाग्रस्त असलेले दांपत्य हे मूळचे पुण्याचे आहे. काही दिवसांपूर्वी ते 40 जणांसह दुबई फिरायला गेले होते. सुरूवातीला त्यांना त्रास जाणवत नसल्याने विमानतळावरून ते थेट घरी आले. मात्र हळूहळू त्रास वाढायला लागल्याने त्यांनी वैद्यकीय मदत घेतली आणि कोरोनाचे निदान झाले. दरम्यान त्यांच्यासोबत फिरलेल्या इतर पर्यटकांची, ओला टॅक्सी चालकाचीदेखील विचारणा करण्यात आली आहे.