मुंबई: कुर्ला स्टेशन रोड भागातील तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला; मात्र कोणतीही जीवितहानी नाही

मुंबई महापालिकेने अतिधोकादायक ठरवलेली ही इमारत रिकामी करण्याचे काम सुरु आहे.

Portion of building collapsed (Photo Credits: ANI)

मुंबईतील अनेक भागात आज सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. ज्याचा परिणाम मुंबईतील (Mumbai) कुर्ला भागात एका 3 मजली इमारतीचा भाग कोसळला. कुर्ला स्टेशन रोड (Kurla Station Road) भागात मुंबई महापालिकेच्या एल विभागाच्या कार्यालयाला लागून असलेल्या नेताब या तीन मजली इमारतीचा काही भाग आज दुपारी 12 च्या सुमारा कोसळला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही इमारत महापालिकेने अतिधोकादायक म्हणून घोषित केली होती. तरी या इमारतीत अनेक कुटूंबे वास्तव्यास होती.

आज दुपारी 12 च्या सुमारास कुर्ल्यातील इमारतीचा काही भाग कोसळला असल्याचे माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मुंबई महापालिकेने अतिधोकादायक ठरवलेली ही इमारत रिकामी करण्याचे काम सुरु आहे. तसेच या इमारतीत लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरु आहे. Mumbai Rains: मुंबई शहर, उपनगरांमध्ये पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता: हवामान खात्याचा अंदाज

जेव्हा हा भाग कोसळला तेव्हा या इमारतीत कुणीही वास्तव्यास नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून परिस्थिती आटोक्यात असल्याचे मुंबई महापालिकेच्या अधिका-यांनी सांगितले.

दरम्यान पुढील काही तास मुंबई शहारामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा मुंबई हवामान खात्याने दिला आहे. तसेच पुढील काही आठवडे महाराष्ट्रात पाऊस बरसण्यास पोषक वातावरण असल्याची माहिती देण्यात आली आहे.