मराठवाडा: चुरशीच्या लढतीत बीड, परळी, लातूर, निलंगा येथून कोण मारणार बाजी? पंकजा मुंडे-धनंजय मुंडे, क्षीरसागर काका-पुतणे जनतेची कोणावर मर्जी?
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, सत्ताधारी पक्षातील मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन चिरंजीव अमित देशमुख आणि धीरज देशमुख, विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे चिरंजीव अशोकराव पाटील निलंगेकर मराठवाड्यात मंत्री रिंगणात आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये महाराष्ट्रात काट्याची टक्कर पहायला मिळत आहे. मराठवाड्यात या वेळी दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, सत्ताधारी पक्षातील मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन चिरंजीव अमित देशमुख आणि धीरज देशमुख, विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे चिरंजीव अशोकराव पाटील निलंगेकर यांचा समावेश आहे. मराठवाड्यात विद्यमान मंत्रिमंडळातील तब्बल 7 मंत्री रिंगणात आहेत. त्यामुळे सहाजिकच सामना रंगतदार होणार आहे. या पार्श्वभूमिवर मराठवाड्यातील अत्यंत चुरशीच्या ठरणाऱ्या या प्रमुख लढती. ज्याकडे मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
बीड विधानसभा मतदारसंघ; काका विरुद्ध पुतण्या
मराठवाड्यामध्ये बीड, परळी, गेवराई, निलंगा या प्रमुख मतदारसंघांमध्ये नात्यागोत्यातील उमेदवारांमध्येच सामना पाहायला मिळत आहे. बीड विधानसभा मतदारसंघांमध्ये काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष आहे. बीड जिल्ह्यात एकेकाळचे शरद पवार यांचे कट्टर समर्थक राहिलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी नुकताच राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत भाजप प्रवेस केला. आता ते भाजप तिकीटावर उमेदवारी करत आहेत. दुसऱ्या बाजूला जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे पुतने संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काका जयदत्त क्षीरसागर विरुद्ध पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्यातील लढाई लक्षवेधी ठरली आहे.
परळी विधानसभा मतदारसं; बहिण विरुद्ध भाऊ
भाजप उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यातील सामना हा मराठवाड्याच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण लढत आहे. दोघेही बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. दोघेही भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मंडे यांच्या राजकीय मार्गदर्शनाखाली वाढले आहेत. 2014 च्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पंकजा मुंडे या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. परळीतील जनता कोणाला साथ देते पाहणे उत्सुकतेचे आहे. (हेही वाचा, शरद पवार यांच्या सभांमुळे शिवसेना पक्षासमोर चिंता? राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चुकवणार सेनेच्या बाणाचा नेम?)
तुळजापूर: मधुकरराव चव्हाण विरुद्ध राजाण जगजितसिंह
मराठवाड्यत तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील लढतही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. इथे काँग्रेस पक्षाचे मधुकरराव चव्हाण रिंगणात आहेत. भाजपने इथे पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मधुकरराव हे 1999 पासून गेली चार वर्षे सलग निवडूण आले आहेत. आता या दोन दिग्गजांमध्ये रंगलेल्या सामन्यत जनता कोणाला साथ देते हे पाहणे महत्त्वाचे.
लातूर: विलासराव देशमुख पर्यायाने काँग्रेसच्या गडात काय होणार?
लातूर हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे सत्ताकेंद्र. राज्याचे माजी मुख्यमंत्री, दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांच्या रुपाने इथे सत्ताकेंद्र निर्माण झाले होते. 2014 च्या लोकसभा, विधानसभा आणि 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपने या सत्ता केंद्राला मोठा धक्का दिला. लोकसभा निवडणूकीत लातूर शहर, लातूर ग्रामीण, औसा, निलंगा, उदगीर आणि अहमदपूर या सहाही मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाला आघाडी मिळाली. त्यामुळे आता विधानसभा निवडणूकीत मागच्या वेळी जिंकलेल्या 3 जागा टिकवण्याचे आव्हान काँग्रेससमोर असणार आहे.
नांदेड: अशोक चव्हाण यांना पुनर्भरारीची संधी
माजी मख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह संपूर्ण चव्हाण कुटुंबियांचा भोकर विधानसभा मतदारसंघ हा पारंपरीक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. अशोक चव्हाण यांच्या पत्नी या मतदारसंघातून गेली पाच वर्षे आमदार होत्या. दरम्यान, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये नांदेड येथून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव झाला. त्यामुळे स्वत: अशोक चव्हाण हे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. भोकरमधून चव्हाण यांच्या विरोधात बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांना उमेदवारी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण पुन्हा रिंगणात आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई असली तरी, त्यांच्यासाठी ही पुनर्भरारीची संधीही असणार आहे.
एकूण 46 मतदारसंघ असलेल्या मराठवाड्यात अनेक दिग्गज रिंगणात आहेत. या दिग्गजांच्या नावांवर नजर टाकता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री डी. पी. सावंत, डॉ. जयप्रकाश मुंदडा, राजेश टोपे, अमित देशमुख, बसवराज पाटील, राणा पाटील, मधुकरराव चव्हाण, बदामराव पंडित, सुरेश वरपूडकर यांच्यासोबतच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विद्यमान मंत्री अतुल सावे, अर्जुन खोतकर, बबनराव लोणीकर, संभाजी पाटील निलंगेकर, पंकजा मुंडे, प्रा. तानाजी सावंत, जयदत्त क्षीरसागर या दिग्गजांचे चेहरे पुढे येतात.