Police Book Santosh Bangar: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल; प्राचार्यांना मारहाण प्रकरण भोवले
आमदार संतोष बांगर यांच्यासह इतरही 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल झाल्याचे समजते.
एकनाथ शिंदे गटाचे (Eknath Shinde Group) आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असतात. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना केलेल्या कथीत मारहाणीप्रकरणी संतोष बांगर नुकतेच चर्चेत आले होते. त्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियातूनही चर्चेत आला होता. दरम्यान, हे प्रकरण आमदार संतोष बांगर यांना चांगलेच भोवले आहे. आमदार बांगर यांच्यावर हिंगोली ग्रामीण पोलीसात (Hingoli Police) गुन्हा दाखल (Police Book Santosh Bangar) झाला आहे. आमदार संतोष बांगर यांच्यासह इतरही 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल झाल्याचे समजते.
आमदार संतोष बांगर यांनी प्राचार्यांना केलेल्या मारहाणीनंतर जवळपास 10 दिवसांनी गुन्हा दाखल केला आहे. आमदार बांगर यांनी प्राचार्यांचा कान पकडून त्यांना मारहाण केली होती. इतकेच नव्हे तर त्यांनी महाविद्यालयातील सीसीटीव्ही यंत्रणेची तोडफोडही केली होती. बांगर यांनी केलेल्या तोडफोडीत महाविद्यालयाचे पाच हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती फिर्यादीने तक्रारीद दिली होती. (हेही वाचा, एकनाथ शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची प्राचार्याला मारहाण, व्हिडिओ व्हायरल)
आमदार संतोष बांगर यांची मारहाण अथवा शिवीगाळ करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही आमदार संतोष बांगर यांनी अनेक शासकीर अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांना शिवीगाळ केल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवीगाळ आणि मारहाणीच्या आरोपांवरुन ते नेहमीच चर्चेत असतात. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतून वेगळ्या गटात गेल्यावरही मंत्रालयात त्यांनी केलेले वर्तन प्रसारमाध्यमांतून चर्चेचा विषय ठरले होते. आमदार संतोष बांगर यांची मात्र या कथीत मारहाणीबद्दल कोणतीही प्रतिक्रिया पुढे आली नाही.
हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मसाई यात्रेतही संतोष बांगर आणि गावकऱ्यांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला होता. वारंगा मसाई यात्रा 8 जानेवारी रोजी होती. वारंगा मसाई गावकऱ्यांचा रिवाझ आहे की, देवीच्या यात्रेत सर्वांनी भक्त आणि भाविक म्हणून यावे. कोणत्याही राजकीय नेत्याने नेता म्हणून येऊ नये. शिवाय राजकीय पुढाऱ्यांना यात्रेलाही बोलावले जात नाही. असे असूनही आमदार संतोष बांगर यांनी मोठ्या लवाजम्यासह यात्रेत हजेरी लावली होती. या वेळी गावकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला होता.