PM Narendra Modi Inaugurated Development Projects: पीएम नरेंद्र मोदींच्या हस्ते राज्यात अनेक योजना-प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन; रस्ते, रेल्वे व सिंचन यांचा समावेश, जाणून घ्या सविस्तर

गरीब, नवयुवक, शेतकरी व महिला हे चार घटक सशक्त झाले तरच देश विकसित होईल. हे लक्षात घेऊन अनेक प्रकल्प व योजनांतून शेतक-यांसाठी सिंचन, गरीबांसाठी घरे, महिलांच्या स्वावलंबनासाठी अर्थसाह्य व युवकांच्या भविष्यासाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत.'

PM Narendra Modi Inaugurated Development Projects

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महाराष्ट्रातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ, पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत देशातील 9 कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण 21 हजार कोटी रू. व राज्यातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना सुमारे 6 हजार 900 कोटी रू. चे वितरण, तसेच राज्यातील सुमारे पाच हजार कोटी रू. निधीतून रस्ते, रेल्वे व सिंचन प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन, तसेच यवतमाळ येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरणही पार पडले. यावेळी, 'विविध योजना व प्रकल्पांद्वारे गेल्या 10 वर्षात देशाच्या विकासाचा नवा पाया रचण्यात आला. देशाचा प्रत्येक कानाकोपरा विकसित करण्याचा आमचा संकल्प आहे. त्यासाठी गरीब, युवक, शेतकरी व महिला या घटकांच्या सशक्तीकरणासाठी व्यापक निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे विकासप्रक्रियेला गती मिळून देशाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होत आहे', असे प्रतिपादन पीएम मोदी यांनी केले.

पीएम म्हणाले, गत 10 वर्षातील योजनांच्या अंमलबजावणीने देशात पुढील 25 वर्षांच्या विकासाचा पाया रचला आहे. गरीब, नवयुवक, शेतकरी व महिला हे चार घटक सशक्त झाले तरच देश विकसित होईल. हे लक्षात घेऊन अनेक प्रकल्प व योजनांतून शेतक-यांसाठी सिंचन, गरीबांसाठी घरे, महिलांच्या स्वावलंबनासाठी अर्थसाह्य व युवकांच्या भविष्यासाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा निधी थेट हस्तांतरित करण्यात येत आहे. ग्रामीण विकासासाठी हर घर जल, पीएम किसान निधी, लखपती दीदी योजना, स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण आदी विविध योजनांचा त्यांनी उल्लेख केला.

पीएम नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले पुढील योजना- प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन- 

 

रस्ते व महामार्गांचे लोकार्पण- 

पंतप्रधानांच्या हस्ते विविध रस्ते, महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ व लाभ वितरण झाले. त्यात वरोरा – वणी महामार्गावरील 18 कि.मी. चौपदरीकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस, वणी, तडाळी, पडोळी यांसारख्या विविध औद्योगिक क्षेत्रांना फायदा मिळेल. सुमारे 378 कोटी रू. निधीतून सलाईखुर्द – तिरोरा महामार्गावरील 42 कि.मी. काँक्रिटीकरणामुळे गोंदिया ते नागपूर प्रवासाच्या वेळेत एक तासाची कपात होऊन नागझिरा अभयारण्याच्या पर्यटनाला चालना मिळेल. सुमारे 291 कोटी रू. निधीतून साकोली – भंडारा जिल्हा सीमेपर्यंतच्या 55.80 कि.मी. दुपदरी रस्त्याचेही लोकार्पण झाले.

सिंचन प्रकल्प- 

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत 1 हजार 683 कोटी रू. निधीतून विदर्भ आणि मराठवाड्यातील 6 प्रकल्पांचे लोकार्पण झाले. या प्रकल्पातून 2.41 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 1 हजार 180 कोटी रू. निधीतून विदर्भ आणि मराठवाड्यातील 45 सिंचन प्रकल्पांमुळे 51 हजार हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.

रेल्वेसेवेचा शुभारंभ- 

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावर 645 कोटी रू. निधीतून न्यू आष्टी-अंमळनेर टप्प्याचे व अंमळनेर-न्यू आष्टी स्टेशनपर्यंत विस्तारित रेल्वे सेवेचा शुभारंभ झाला. त्याचा लाभ बीड जिल्ह्यातील नागरिक व कामगार वर्गाला मिळेल. सुमारे 675 कोटी रू. निधीतून वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गावरील वर्धा-कळंब  या टप्प्याचे लोकार्पण व नवीन रेल्वे गाडीचा शुभारंभ झाला. त्यामुळे वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील दळणवळण गतिशील होईल. यवतमाळ जिल्ह्यात प्रथमच ब्रॉडगेज रेल्वे सेवा सुरू झाली आहे.

महिला सशक्तीकरण अभियान- 

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत 5.50 लाख महिला बचत गटांना 825 रू. कोटी फिरत्या निधीचे वितरण करण्यात आले. स्वयंसहाय्यता समूहांना अतिरिक्त खेळते भांडवल देण्यासाठी 913 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली. आयुष्मान भारत अंतर्गत महाराष्ट्रात 1 कोटी आयुष्मान कार्डचे वितरण होत असून, योजनेच्या 3 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात कार्डचे वितरण करण्यात आले.

इतर मागास प्रवर्गासाठी मोदी आवास योजनेचा शुभारंभही झाला. त्यात येत्या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यात येणार असून,  2.5 लाख लाभार्थ्यांना रु. 375 कोटींच्या पहिल्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण करण्यात आले. (हेही वाचा: धक्कादायक! निवेदनांवर CM Eknath Shinde यांची खोटी स्वाक्षरी; मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार दाखल)

 पीएम किसान सन्मान निधीचा 16 वा हप्ता थेट बँक खात्यात

पीएम किसान सन्मान निधीच्या 16 व्या हप्त्याचे थेट बँक खात्यात वितरित झाले. देशातील 9 कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण 21 हजार कोटी रुपयांचे, तसेच राज्यातील सुमारे 88 लाख शेतकरी कुटुंबांना 1 हजार 969 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. आधार लिंक बँक खात्यात लाभांचे डिजिटल हस्तांतरण करण्यात आले. नमो शेतकरी महासन्मान निधीअंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. त्यात राज्यातील सुमारे 88 लाख शेतकरी कुटुंबांना 3 हजार 800 कोटी रुपयांचा लाभ मिळाला.