PM Modi to Inaugurate Pune Metro: पुणेकरांसाठी खुशखबर! पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर रोजी करणार PCMC-Swargate मेट्रो लाईनवरील भूमिगत मार्गाचे उद्घाटन
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानचा मार्ग 26 सप्टेंबरपासून कार्यान्वित होणार आहे. शासनाने या मार्गाला दोन विस्तार जोडण्याची योजना आखली आहे.
PM Modi to Inaugurate Pune Metro: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका काही आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान ते सत्ताधारी महायुती आघाडीसाठी निवडणूक प्रचाराला सुरुवात करू शकतात, असे मानले जात आहे. पीएम मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी अनेक विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, पीएम मोदी 26 सप्टेंबर रोजी पुण्यात नवीन भूमिगत मेट्रो रेल्वेचे (Pune Metro) उद्घाटन करतील आणि उन्नत मार्गाची पायाभरणी करतील.
पुण्यातील दिवाणी न्यायालय ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे विस्तारीकरण आणि पिंपरी चिंचवड ते निगडी असा उन्नत मार्ग उभारण्याचे भूमिपूजनही ते करणार आहेत. फडणवीस म्हणाले की, पुणे मेट्रोसाठी आम्ही नवीन टप्पे बांधत आहोत. गणपती उत्सवात मूर्ती विसर्जनासाठी 3.5 लाख लोकांनी मेट्रोने प्रवास केला. (हेही वाचा: Pune Airport: प्रवाशांना दिलासा! पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर 300 नाही तर, अवघ्या 20 रुपयांमध्ये मिळणार चहा, पाणी सारखी पेये, सुरु होणार नवीन स्टॉल)
पीसीएमसी-स्वारगेट पुणे मेट्रो कॉरिडॉर 17.4 किलोमीटर लांबीचा असून त्यात 14 स्थानके समाविष्ट आहेत. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानचा मार्ग 26 सप्टेंबरपासून कार्यान्वित होणार आहे. शासनाने या मार्गाला दोन विस्तार जोडण्याची योजना आखली आहे, एक पीसीएमसी ते निगडी आणि दुसरा स्वारगेट ते कात्रज. दरम्यान याआधी 6 मार्च 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या वनाज ते गरवारे महाविद्यालय या 12 किमी मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.