Pimpri Chinchwad Tragedy: पिंपरी चिंचवड मध्ये टाकी कोसळून मृत मजूरांच्या संख्येत वाढ
पण कोसळली कशी? याचा तपास सुरू आहे.
पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मध्ये वॉटर टॅन्क कोसळल्याने मृत पावलेल्या मजुरांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. हॉस्पिटल मध्ये जखमी मजूरांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 7 च्या सुमारास त्यांना या घटनेची माहिती मिळाली आहे. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांसोबत अग्निशमन दल आणि मेडिकल टीम पोहचली. त्यांच्याकडून तातडीने जखमींना हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत मजूर हे राज्याबाहेरील आहेत. परंतू त्यांची माहिती घेतली जात आहे. दोषींविरूद्ध कारवाई केली जाईल असेही पोलिस म्हणाले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
भोसरीच्या सदगुरू नगर मध्ये ही घटना घडली आहे. 12 फूट उंच पाण्याची टाकी बांधली होती. आज सकाळी काही मजूर आंघोळीसाठी गेले होते. अचानक टाकीची मोठी भिंत कोसळली आणि ढिगार्याच्या खाली मजूर दबले.
पाण्याची टाकी ही नुकतीच बांधलेली होती. पण कोसळली कशी? याचा तपास सुरू आहे. या टाकीच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्न विचारले जात आहेत. तसेच कंत्राटदारावर कारवाई होण्याची देखील शक्यता आहे.