महाराष्ट्र: सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळ सुरु होण्यासाठी लोकांना आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार

चिपी विमानतळाच्या धावपट्टीचा पृष्ठभागाचे काम समाधानकारक झाले नसल्याने प्रवासी वाहतुकीसाठी धावपट्टी परिपूर्ण नसल्याचे केंद्राच्या DGCA पथकाने अहवाल दिला आहे.

Airport Representative Image (Photo Credits: PTI)

सिंधुदुर्गात (Sindhudurg) महत्त्वाचे समजले जाणारे चिपी विमानतळ (Chipi Airport) कधी सुरु होणार याकडे लोक डोळे लावून बसले आहेत. यामुळे कोकणात जाणे प्रवाशांना आणखी सोयीचे होणार आहे. शिवाय या विमानतळामुळे येथील उद्योगधंद्यांना चालना मिळेल. देश-विदेशापर्यंत आयात-निर्यात करणे सुलभ होणार आहे. त्यामुळे सर्वचजण हे विमानतळ सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र हे विमानतळ पुर्ण होण्यासाठी अजून काही कालावधी लागणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी सांगितले आहे. चिपी विमानतळाच्या धावपट्टीचा पृष्ठभागाचे काम समाधानकारक झाले नसल्याने प्रवासी वाहतुकीसाठी धावपट्टी परिपूर्ण नसल्याचे केंद्राच्या DGCA पथकाने अहवाल दिला आहे. ABP माझाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

चिपी विमानतळाच्या धावपट्टीचा पृष्ठभाग अजूनही काही प्रमाणात खराब झाला असल्यामुळे अजून काही कालावधी विमानतळ सुरू होण्यासाठी लागेल अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.हेदेखील वाचा- चिपी विमानतळाबद्दल '८' खास इंटरेस्टिंग गोष्टी

प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी ज्या पद्धतीची धावपट्टी वरील पृष्ठभाग तयार झाला पाहिजे तसा तयार झाला नसल्याने DGCA ने प्रमाणपत्र दिलेलं नाही. त्यामुळे चिपी विमानतळ अजून काही काळ लांबणीवर गेल्याच चित्र आहे. 9 मार्चपर्यंत IRB ने DGCA ला हवी तशी धावपट्टी बनवून दिली नाही तर महाराष्ट्र सरकार हा चिपी विमानतळ ताब्यात घेईल. IRB कडून चिपी विमानतळचा करार रद्द करून राज्य सरकार ताब्यात घेऊन महाराष्ट्र एव्हिएशन कंपनीच्या ताब्यात देण्यात येईल, असं विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिपी विमानतळ पूर्ण झालेला आहे. मात्र त्यात काही तांत्रिक बाबी पूर्ण होणे बाकी आहे. ते झाल्यानंतर हे विमानतळ सुरु करण्यात येईल. तांत्रिक बाबीमुळे हे विमानतळ सुरु करण्यास थोडा उशीर होत आहे. मात्र तरीही हे विमानतळ लवकरात लवकर सुरु होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्य सरकारने करारात दिलेल्या सुविधा पुरवल्या नसल्याने विमानतळ सुरू होण्यासाठी विलंब होत आहे. राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि खासदार चिपी विमानतळ सुरु करणार म्हणून खोट सांगून जनतेला फसवत आहेत. चांगला मुहूर्त काढणारा माणूस बघून चिपी विमानतळाचा मुहूर्त काढून घ्यावा, अशी टीका मनसे कोकण संघटक परशुराम उपरकर यांनी केली.