A Pigeon | Representative Image | (Photo Credits: Wikipedia)

प्राणी-पक्षांना उघड्यावर खायला घालणाऱ्या प्राणीप्रेमींसाठी निराशाजनक बातमी आहे. प्राणीप्रेमींची ही भुतदया त्यांना चांगलीच महागात पडणार आहे. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, कुत्रा, मांजर, कबुतर यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालत असाल आणि त्याचा इतरांना त्रास होत असेल तर तुम्हाला 500 रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे. पालिकेच्या स्वच्छता आणि आरोग्य विभागातर्फे अशा व्यक्तींवर कठोर कारवाईही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

घराच्या बाल्कनीतून पक्षांना दाणे घातल्याने पक्ष्यांची विष्ठा आणि पिसांचा कचरा होतो. तसंच त्यांच्या विष्ठा आणि पंखांतून पडणाऱ्या जंतूंमुळे श्वसनाशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. या सर्व गोष्टींचा विचार करुन आता घराच्या बाल्कनीतूनही पक्षांना दाणे घालता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.

तसंच सार्वजनिक ठिकाणी प्राणी पक्षांना खाऊ घालणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पालिकेच्या विभाग कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. मुंबईच्या काही भागात घन कचरा विभागाने या नियमांचे फलक लावले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास पालिकेकडून कारवाई करण्यात येईल.