कर्जमाफीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
बँकेने कर्जमाफ करावे यासाठी शेतकरी उपोषण करत असल्याची माहिती पाथरी शाखेतील इंस्पेक्टर विद्यासागर श्रीमानवर यांनी दिली.
कर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या परभणीतील 39 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तुकाराम काळे असे या शेतकऱ्याचे नाव असून तो परभणीतील मरडसगावचा रहिवासी आहे.
स्टेट बँकेच्या पाथरी शाखेसमोर काही शेतकऱ्यांसह तुकाराम देखील उपोषणाला बसले होते. बँकेने कर्जमाफ करावे यासाठी शेतकरी उपोषण करत असल्याची माहिती पाथरी शाखेतील इंस्पेक्टर विद्यासागर श्रीमानवर यांनी दिली.
तुकाराम यांची प्रकृती दुपारी बिघडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मात्र शेतकरी चांगलेच संतापले आणि त्यांनी ठिय्या आंदोलनही केले. जिल्हाधिकारी आणि बँक प्रशासन यांच्या विरोधात गुन्हा नोंदवल्याशिवाय शेतकऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत असा पवित्रा भाकपचे नेते कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्त्वाखाली घेण्यात आला आहे.