Anil Deshmukh: ईडी,सीबीआय यांना पूर्ण सहकार्य, परम बीर सिंह यांना संशयास्पद भूमिकेमुळेच आयुक्तपदावरून हटवले; अनिल देशमुख यांचा पुनरुच्चार

त्यांची भूमिका अत्यंत संशयास्पद होती. त्यांना माझ्यावर आरोपच करायचे होते तर पदावर असताना का केले नाहीत? असा सवालही राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

Anil Deshmukh | (Photo Credits: ANI)

केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (Central Bureau of Investigation), अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) आदी संस्थांच्या पथकांनी निवासस्थानांवर टाकलेल्या धाडीनंतर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. सीबीआय (CBI) असो की ईडी (ED) संस्था कोणतीही असली तरी या सर्व संस्थांच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले आहे. या पुढेही करणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांन दिली. तसेच, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी माझ्यावर केलेले आरोप हे त्यांना पदावरुन हटविण्यात आल्यानंतर करण्यात आलेले आहेत. अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीनच्या कांड्या भरुन ठेवण्यात आलेल्या गाडी प्रकरणात परमबीर सिंह यांची भूमिका प्रचंड संशयास्पद होती. ही भूमिका संशास्पद असल्यानेच त्यांना पदावरुन हटविण्यात आल्याचा पुनरुच्चार अनिल देशमुख यांनी केला आहे.

अनिल देशमुख यांनी सांगितले की, परम बीर सिंह यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून काढून टाकल्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. त्यांची भूमिका अत्यंत संशयास्पद होती. त्यांना माझ्यावर आरोपच करायचे होते तर पदावर असताना का केले नाहीत? असा सवालही राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. (हेही वाचा, Sharad Pawar On ED, CBI: नव्या राज्यकर्त्यांकडून सीबीआय, ईडी द्वारे सूड उगवण्याचा देशात नवा पॅटर्न- शरद पवार)

एएनआय ट्विट

एपीआय सचिन वाझे, रियाजुद्दीन काझी, विनायक शिंदे, प्रकाश धुमाळ सुनील माने हे पाच पोलीस आणि अधिकारी थेट परमबीर सिंह यांना रिपोर्टींग करत होते. त्यांच्या इतर कोणत्याही वरिष्ठांना ते रिपोर्टींग करत नव्हते. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व पोलीस पोलीस आयुक्तालयामध्ये सीआययू विभागात कर्तव्यास होते. जिलेटीन प्रकरणात हे सर्व अधिकारी गुंतले असल्याची माहिती शासनाला मिळाली. तेव्हा या सर्व प्रकरणात परमबीर सिंह यांची आयुक्त म्हणूनही भूमिका संशयास्पद होती, असे पुढे आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.