पंकजा मुंडे यांनी अखेर मांडली आपली बाजू; पहा काय म्हणाल्या त्या
चर्चांना आता पूर्णविराम लागू शकतो कारण पंकजा मुंडे यांनी अखेर माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे मागील काही दिवसांपासून चर्चेत राहिल्या आहेत. त्यांनी केलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तसेच त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपचा उल्लेख देखील काढून टाकला होता. पण या चर्चांना आता पूर्णविराम लागू शकतो कारण पंकजा मुंडे यांनी अखेर माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
माध्यमांशी बोलताना, पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मी 12 डिसेंबरला माझा एक निर्णय सांगणार असल्याचे मी आधी सांगितले आहे. मला आत्मचिंतनासाठी आणि स्वतःशी बोलण्यासाठी वेळ हवा आहे. तो वेळ मला द्यावा. मी ती पोस्ट अलीकडेच केली आहे आणि लगेचच त्यावर बोलणं, भाष्य करणं मला शक्य नाही. पण इतकंच सांगते की मी दरवर्षी गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम घेते. माझ्या पोस्टवर सुरुवातीला सर्वच चॅनलने व्यवस्थित बातमी दिली. मात्र, एक दोन वर्तमानपत्रांनी पंकजा मुंडे पक्ष सोडणार अशी बातमी केली. यानंतर या सर्व चर्चेला वेगळा सूर आला आणि वेगळ्या पद्धतीने हाताळणी सुरु आहे. त्यामुळे मी खरंच खूप दुःखी आणि व्यथित आहे.”
तसेच त्या असंही म्हणाल्या की, "पहिल्यांदा मी मुख्यमंत्री होणार असा दावा करण्यात आला. 2014 मध्ये तशा बातम्या आल्या होत्या. नंतर मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशा बातम्या पेरल्या गेल्या. आता ही बातमी आली आहे. मला ही बातमी व्यथित करणारी आहे. मी विधानसभेला माझ्या मतदारसंघात पराभूत झाली असले तरी निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मी इतर उमेदवारांच्या सभा घेत होते."