Raghunath Yemul Arrested: 'तुझी बायको पांढऱ्या पायाची, तू मंत्री-आमदार होणार नाही!'; पुणे येथून राजकीय गुरु, अध्यात्मिक बाबा रघुनाथ येंमुल यास अटक
पुणे येथील एका प्रतिष्ठीत कुटुंबास सुनेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्याच्या कारणावरुन या राजकीय गुरुला अटक झाल्याची माहिती आहे.
राजकीय गुरु, अध्यात्मिक बाबा म्हणून ओळख असलेल्या रघुनाथ येंमुल (Raghunath Yemul) नामक व्यक्तीस पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. पुणे येथील एका प्रतिष्ठीत कुटुंबास सुनेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्याच्या कारणावरुन या राजकीय गुरुला अटक झाल्याची माहिती आहे. प्राप्त तक्रारीवरुन चतुःश्रृंगी पोलिसांनी रघुनाथ येंमुल यास बेड्या ठोकल्या. रघुनाथ येंमुल याच्या विरोधात एका पीडित महिलेने तक्रार दिली होती. पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी रघुनाथ येंमुल हा तिच्या पतीला 'तुझी बायको पांढऱ्या पायाची आहे, त्यामुळे तू मंत्री-आमदार होणार नाहीस. तिला सोडचिठ्ठी दे!' असे सांगून भडकवत असे. त्यातून तिचे कुटुंबीय तिचा छळ करत असत. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे.
रघुनाथ राजाराम येमुल (वय ४८, रा. धवलगिरी अपार्टमेंट, आयवररी इस्टेट, बाणेर) हे पुणे जिल्ह्यातील बऱ्यापैकी परिचीत आणि प्रसिद्ध प्रस्थ आहे. पुण्यातील अनेक राजकीय मंडळी, प्रतिष्ठीत कुटुंबातील सदस्य आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही येंमुल याच्या दरबारात उठबस असते. अनेक अधिकारी, राजकीय मंडळी आणि प्रतिष्ठीत लोक या बाबाच्या नादाला लागल्याची नेहमीच परिसरात चर्चा असते. ही उठबस पाहता राजकीय गुरु अशी उपाधीही काहींनी त्याला बहाल केली. दरम्यान, पोलिसांनी अटक केल्यांनतर त्याच्या या बनवेगिरीचे सोंग उतरले आहे. आता पुढील तपासात या राजकीय आणि अध्यात्मिक बाबाचा बुरखाही फाटला जाईल, अशी चर्चा रंगली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांकडील तक्रारीनुसार, पुण्यातील एका प्रतिष्ठीत व्यक्तीस आणि त्यांच्या कुटुंबीयास रघुनाथ येमुल याने सांगितले की, संबंधित व्यक्तीची पत्नीही पांढऱ्या पायाची आहे. त्यामुळे सदर व्यक्तीच्या (महिलेचा पती) कार्यात अडथळा येतो. या पत्नीुळे तो आमदार खासदार होणार नाही. तिला सोडचिठ्ठी द्यावी. तसेच, मुलाचा ताबाही पतीने आपल्याकडे घ्यवा, असा सल्ला या राजगीय गुरुंनी दिला. पुढे त्याने पत्नीवरुन ओवाळून टाकण्यास एक लिंबूही दिले. या सर्व प्रकाराला कंटाळलेल्या एका पीडित विवाहितेने (वय 27 वर्षे) पोलिसांत तक्रारी दिली. या तक्रारीनंतर या प्रकरणाचा भांडाफोड झाला. जानेवारी 2017 पासून आपल्यासोबत हा सगळा प्रकार सुरु असल्याचा आरोपही पीडितेने आपल्या तक्रारीत केला आहे.
कोण आहे हा रघुनात येमुल?
रघुनाथ येंमुल हा पुण्यातील उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या बाणेर परिसरातील आयव्हरी इस्टेट भागात राहतो. त्याची राजकीय नेते ते अनेक प्रशासकीय अधिकारी आणि पुण्यातील उच्चभ्रु कुटुंबांसोबत उठबस आहे. अनेक राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि प्रतिष्ठीत लोक त्याच्या दरबारात हजेरी लावतात अशी दबक्या अवाजात नेहमीच चर्चा असते. दरम्यान, स्वत:ला राजकीय गुरु, अध्यात्मीक बाबा समजणाऱ्या या 48 वर्षीय व्यक्तीस अटक झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उढाली आहे.