हिवाळी अधिवेशन : पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी
अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. सध्या राज्यात दोनच प्रश्नांनी थैमान घातले आहे, एक दुष्काळ आणि दुसरा म्हणजे आरक्षण. याच मुद्यांवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गेल्या काही महिन्यांपासून सध्याचे सरकार अनेक मुद्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे विरोधी पक्ष भाजपला कोंडीत पकडण्याची चांगलीच शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात प्रवेश करताच, ‘या सरकारचं करायचं काय, खाली डोके वर पाय’, ‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’, अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. याचसोबत मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी तसेच दुष्काळी मदत म्हणून सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये देण्याची मागणी विरोधकांनी केली.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन तब्बल 55 वर्षांनी मुंबईत होत आहे. मराठा तसेच मुस्लीम आणि धनगर समाज आरक्षण, अवनी वाघिणीचा मृत्यू, राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती, शेतकरी आत्महत्या, जलयुक्त शिवारची फसलेली योजना, शिवस्मारकाचा मुद्दा, भाजपमधील अंतर्गत वाद या पार्श्वभूमीवर हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. याची पहिली झलक आज पाहायला मिळाली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित होते.