Coronavirus Test साठी ऑनलाईन बुकिंग सुरु; आता मुंबईकरांना घरी बसून करता येणार कोरोना विषाणूची चाचणी, जाणून घ्या प्रक्रिया व शुल्क
या संदर्भात, ऑनलाइन वैद्यकीय सल्लागार कंपनी प्रॅक्टोने (Practo) एक नवीन उपक्रम सुरू केला आहे
कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्धच्या युद्धात आता सरकारने खासगी कंपन्यांच्या सहभागास प्रोत्साहन दिले आहे. या संदर्भात, ऑनलाइन वैद्यकीय सल्लागार कंपनी प्रॅक्टोने (Practo) एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. प्रॅक्टो आता कोरोना विषाणूची चाचणी घेण्यासाठी ऑनलाइन बुकिंग सेवा देत आहे. जर आपल्याला तीव्र ताप, कोरडा खोकला अशी लक्षणे दिसली आणि रुग्णालयात जाण्याची भीती वाटत असेल, तर या चाचणीची ऑनलाइन सेवा आपल्या वापरासाठी आहे. प्रॅक्टो कंपनीने कोरोना चाचणीसाठी थायरोकेयर कंपनीशी करार केला आहे. भारत सरकारनेही या उपक्रमास मान्यता दिली आहे.
प्रॅक्टो ही एक बंगळूरस्थित ई-कंपनी आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरने प्रॅक्टोच्या सेवांना मान्यता दिली आहे. प्रॅक्टोच्या इतर सेवा संपूर्ण देशासाठी असून, कोरोना विषाणू चाचणीची सुविधा सध्यातरी फक्त मुंबईकरांना देण्यात आली आहे. जर हा प्रयोग यशस्वी आणि लोकांमध्ये लोकप्रिय झाला, तर तो देशाच्या इतर राज्यातही सुरु केला जाईल. या ऑनलाईन कोरोना विषाणू चाचणीसाठी काही औपचारिकता निर्धारित केल्या आहेत. याअंतर्गत डॉक्टरांचे वैध प्रिस्क्रिप्शन असणे आवश्यक आहे. सोबत, विनंती फॉर्म देखील ऑनलाईन भरावा लागेल. फोटो ओळखपत्रासह, कंपनीला आपली ओळख दाखवावी लागेल. (हेही वाचा: COVID-19 च्या मृतदेहांच्या अंत्यविधीबाबत BMC कडून प्रसिद्ध करण्यात आलेले परिपत्रक नवाब मलिक यांच्या मागणीवरुन घेण्यात आले मागे)
सध्या तरी, प्रॅक्टोने सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या कोरोना विषाणूची फी 4500 रुपये निश्चित केली आहे. बुकिंग केल्यानंतर, प्रॅक्टो पॅथॉलॉजिस्ट आपल्या घरी पोहोचेल आणि नमुने घेईल. हे नमुने चाचणीसाठी स्वाब व्हायरल ट्रान्सपोर्ट माध्यमाद्वारे संकलित केले जातील. कोरोना व्हायरस चाचणीसाठी निवडलेला नमुना कोल्डचेन द्वारे थायरोकेअर प्रयोगशाळेत पाठविले जाईल. त्यानंतर चाचणी निकाल येण्यासाठी आपल्याला 24-48 तास प्रतीक्षा करावी लागेल.