एका मताची गोष्ट, एकमतापूर्वी एक मत महत्त्वाचं; निवडणूकीच्या रिंगणात भल्याभल्यांना दणका, दिग्गज पराभूत

निर्णायक ठरणारं केवळ एक मत न मिळाल्याने निवडणूकीच्या रिंगणात आजवर भल्याभल्यांना दणका, दिग्गज पराभूत झाले आहेत. एका मताचे महत्त्व सांगणाऱ्या या काही घटना. भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी ते इंग्लंडचे माजी पंतप्रधान दिवंगत जेम्स कॅलहोन यांच्यापर्यंत.

Voting In India | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Election 2019: मतदान हा भारतीय नागरिकाला मिळालेला एक महत्त्वाचा आणि अभूतपूर्व असा अधिकार. 18 वर्षे पूर्ण असलेल्या सर्व नागरिकांना कायद्याने मतदानाचा हक्क मिळतो. जो लोकशाही देशातील निवडणूक प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. पण, आपल्यापैकी अनेक जण मतदान करण्यास टाळाटाळ करतात. यावर आपल्या एका मताने असा किती फरक पडणार आहे, असा त्यांचा सोईस्कर युक्तीवाद असतो. तुम्हीही असाच विचार करत असाल तर, ही माहिती तुमच्याचसाठी आहे. लोकशाही प्रक्रियेत एकमत करणं सोपं असतं पण निर्णायक ठरणारं एक मत मिळवणं फार कठीण असतं. निर्णायक ठरणारं केवळ एक मत न मिळाल्याने निवडणूकीच्या रिंगणात आजवर भल्याभल्यांना दणका, दिग्गज पराभूत झाले आहेत. एका मताचे महत्त्व सांगणाऱ्या या काही घटना. भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी ते इंग्लंडचे माजी पंतप्रधान दिवंगत जेम्स कॅलहोन यांच्यापर्यंत.

..आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार कोसळले

ते साल होतं 1999. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. अटल बिहारी वाजपेयी म्हणजे कसलेले राजकारणी आणि फर्डे वक्ते. तसेच, तडफदार व्यक्तमत्व. अशा व्यक्तिमत्वाच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला. अटल बिहारी वाजपेयी या अविश्वास ठरावाला सामोरे गेले. परंतू, बहुमतात त्यांची गाडी अडकली. निर्णायक ठरणारे एक मत त्यांना मिळवता आले नाही. परिणामी अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार अवघ्या 13 दिवसात कोसळले. सभागृहात झालेल्या मतदानावेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या बाजूने 269 तर विरोधात 270 मतं पडली. अटलजींचे सरकार केवळ एका मताने कोसळले.

एका मतासाठी उडवली चिठ्ठी

सन 2017. प्रसंग - मुंबई महानगर पालिका निवडणूक. भारतीय जनता पक्षाचे अतुल शाह आणि शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर या दोन्ही उमेदवारांना योगायोगाने समान मते पडली. दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 226 इतकीच मते पडली होती. आता कोणाला विजयी घोषीत करायचे हा प्रश्न निर्माण झाला. अखेरीस चिठ्ठी उडवण्याचा निर्णय झाला. चिठ्ठी उडवली गेली. अशा पद्धतीने केलेल्या निवाड्यात निकाल भाजपच्या अतुल शाह यांच्या बाजूने लागला परिणामी शिवसेना पक्षाचे सुरेंद्र बागलकर पराभूत झाले. (हेही वाचा, दोन्ही हात नाहीत तरी 'या' शेतकऱ्याने केले मतदान; पायावर लावून घेतली शाई (See Photo))

एकमताने नव्हे एका मताने पराभव

राज - कर्नाटक, वर्ष - 2004, प्रसंग-कर्नाटक विधानसभा निवडणूक. ए. आर कृष्णमूर्ती नावाचे एक उमेदवार या निवडणुकीत मैदानात होते. या निवडणुकीत कृष्णमूर्ती यांना एकूण 40, 751 मतं पडली. तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला त्यांच्या पेक्षा फक्त एक मत अधिक पडले. म्हणजेच कृष्णमूर्ती यांच्या प्रतिस्पर्ध्याला 40,752 मतं पडली. परिणामी काय घडले असेल वेगळे सांगायला नको. यातून एका मताचे महत्त्व आपण जाणताच.

एका मतामुळे मुख्यमंत्री पदावर पाणी

राज्य- राजस्थान, वर्ष-209, प्रसंग- विधानसभा निवडणूक. विधानसभा निवडणुकीत सी.पी. जोशी हे उमेदवार होते. त्या काळात सी.पी. जोशी हे मख्यमंत्री पदाचे दावेदार होते. ते केवळ दावेदारच नव्हते तर निवडणुकीनंतर तेच मुख्यमंत्री होतील अशी राजकीय वर्तुळात खात्री होती. परंतू, निवडणुकीच्या रिंगणात घडले भलतेच. सीपी जोशी चक्क पराभूत झाले. केवळ एका मताच्या फरकाने. होय, सी.पी. जोशी यांना या निवडणुकीत 62,215 मतं मिळाली. तर, त्याच्या विरोधात उभे असलेले कल्याण सिंह चौहाण यांना 62,216 मतं मिळाली. अत्यंत अटितटीचा ठरलेल्या या सामन्यात केवळ एका मताने सी.पी. जोशी पराभूत झाले. या पराभवामुळे त्यांना संभाव्य मुख्यमंत्री पदावर पाणी सोडावे लागले.

इंग्लंडच्या माजी पंतप्रधान राहिलेल्या दिवंगत मार्गारेट थेचर यांच्याबाबतही एका मताने इतिहास घडवला आहे. थॅचरबाई इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षनेत्या होत्या. तत्कालीन पंतप्रधान जेम्स कॅलहेन यांच्याविरोधात त्यांनी अविश्वास ठराव दाखल केला. या वेळी या ठरावाच्या बाजूने 311 मते मिळाली. तर, ठरावाच्या विरोधात 310 मते मिळाली. केवळ एका मतामुळे जेम्स कॅलहोन यांचे सरकार कोसळले. आता इतके सगळे किस्से आणि प्रसंग वाचल्यानंतर एका मताचे महत्त्व काय? हा प्रश्न आपण बहुदा विचारणार नाही. आणि आपल्यालालाही आपल्या मताचे महत्त्व चांगलेच कळले असेल. नाही का?