One Station One Product Scheme: रेल्वे मंत्रालयाने राज्यातील 69 स्थानकांवर सुरु केली 'एक स्टेशन एक उत्पादन' योजना; होणार स्थानिक लोकांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री

या ठिकाणी लोकांना स्थानिक लोकांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तू मिळू शकतील. यामध्ये स्थानिक जमातींनी तयार केलेल्या कलाकृती, स्थानिक विणकरांनी तयार केलेल्या हातमाग, प्रसिद्ध हस्तकला जसे की कोरीव लाकूड काम, चिकनकारी भरतकाम आणि कपड्यांवरील जरी-जरदोजी काम यांचा समावेश होतो.

One Station One Product Scheme (संग्रहित संपादित प्रतिमा)

‘वोकल फॉर लोकल’ (Vocal for Local) व्हिजनला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक कारागिरांना पाठिंबा देण्यासाठी, रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील 69 रेल्वे स्थानकांवर 'एक स्टेशन एक उत्पादन' (OSOP) योजना यशस्वीपणे सुरू केली आहे. संपूर्ण राज्यात 15 मे 2023 पर्यंत एकूण 72 OSOP आउटलेट्सची स्थापना करण्यात आली आहे. ही आउटलेट्स स्वदेशी उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी एक व्यासपीठ प्रदान करतील. या ठिकाणी अनेक स्थानिक कारागीर आपली कला अथवा वस्तू विकू शकतील.

25 मार्च 2022 रोजी सुरू करण्यात आलेल्या OSOP योजनेचा उद्देश महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशावर प्रकाश टाकत, समाजातील उपेक्षित घटकांसाठी अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी निर्माण करणे हा आहे. अहमदाबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनने डिझाइन केलेले हे आउटलेट्स संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये एकसमानता सुनिश्चित करतात.

प्रत्येक OSOP आउटलेट स्थानिक प्रदेशासाठी अद्वितीय उत्पादने ऑफर करेल. या ठिकाणी लोकांना स्थानिक लोकांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तू मिळू शकतील. यामध्ये स्थानिक जमातींनी तयार केलेल्या कलाकृती, स्थानिक विणकरांनी तयार केलेल्या हातमाग, प्रसिद्ध हस्तकला जसे की कोरीव लाकूड काम, चिकनकारी भरतकाम आणि कपड्यांवरील जरी-जरदोजी काम. याव्यतिरिक्त, आउटलेटमध्ये स्थानिक पातळीवर पिकवलेले आणि प्रक्रिया केलेले किंवा अर्ध-प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ जसे की- मसाले, चहा, कॉफी आणि इतर विशेष उत्पादने मिळतील. (हेही वाचा: Government On Generic Medicine: मोदी सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा; सरकारी डॉक्टरांना जेनेरिक औषधेच लिहून देण्याचा इशारा, अन्यथा होणार कारवाई)

महाराष्ट्रातील OSOP आउटलेट्स राज्याची समृद्ध विविधता दर्शवतात. या ठिकाणी उपलब्ध असलेल्या काही उत्पादनांमध्ये केळी, द्राक्षे, पापड, लोणची, सांबरवडी, चामड्याची उत्पादने, घरगुती अगरबत्ती, धूप, साबण, फिनाईल, खादी उत्पादने, कोल्हापुरातील हस्तनिर्मित कोल्हापुरी चप्पल, कणकवली आणि कुडाळमधील लाकडी खेळणी, लोणावळ्यातील चिक्की आणि फज उत्पादने, नाशिकरोडमधील पैठणी साड्या, कापड, हातमाग, कापडापासून हाताने बनवलेल्या पर्स आणि पिशव्या, साताऱ्यातील कंदी पेढा, सोलापुरी बेडशीट्स आणि टॉवेल, वारली कला आणि हस्तकला, सॉफ्ट टॉईज यांचा समावेश होतो.