Omicron in Maharashtra: महाराष्ट्रातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या पोहोचली 20 वर; देशातील एकूण रुग्णांपैकी 50 टक्के फक्त एकट्या राज्यात
परंतु राज्य सरकारला असा निर्णय घ्यायचा नाही
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत आहे. सध्या देशात ओमायक्रॉन (Omicron) या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराने धुमाकूळ घातला आहे. महत्वाचे म्हणजे देशातील एकूण ओमायक्रॉन रुग्णांपैकी एकट्या महाराष्ट्रात त्यातील 50 टक्के आहेत. सोमवारी राज्यात दोन रुग्ण आढळून आले. त्यापैकी एक लातूरचा तर एक पुण्याचा आहे. अशा स्थितीत आता राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संख्या 20 झाली आहे. या दोन नवीन प्रकरणांची पुष्टी झाल्यानंतर, देशातील ओमायक्रॉन संक्रमितांची संख्या 40 वर पोहोचली आहे.
महाराष्ट्रात 24 तासांत कोरोनाचे 569 नवे रुग्ण आढळून आले असून, 498 रुग्ण बरे झाले आहेत. यासह 5 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या राज्यात कोरोनाचे 6,507 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्राव्यतिरिक्त, पाच राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. राजस्थानमध्ये नऊ, कर्नाटक आणि गुजरातमध्ये प्रत्येकी तीन, त्यानंतर दिल्लीमध्ये दोन प्रकरणे आढळली आहेत. केरळ, आंध्र प्रदेश आणि चंदीगडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
'ओमायक्रॉन' हा प्रकार अनेक उत्परिवर्तनांचा परिणाम असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. कोविडच्या B.1.1.1.529 या अधिक संसर्गजन्य स्वरूपाची माहिती दक्षिण आफ्रिकेने 24 नोव्हेंबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) दिली होती. यानंतर बोत्सवाना, बेल्जियम, हाँगकाँग, इस्रायल, यूके, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, नेदरलँड, जपान, जर्मनी आणि फ्रान्ससह अनेक देशांमध्येही याची ओळख पटली आहे. कोरोना विषाणूच्या विविध प्रकारांपैकी ओमायक्रॉन हा सर्वात धोकादायक प्रकार मानला जात आहे. (हेही वाचा: सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र-गुजरात सरकारला फटकारले, कोरोनामुळे जीव गमावलेल्यांच्या नातेवाईकांना एका आठवड्यात भरपाई देण्याचे आदेश)
महाराष्ट्रात ओमायक्रॉनची अशी वाढती प्रकरणे पाहता, राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लादण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु राज्य सरकारला असा निर्णय घ्यायचा नाही. मात्र मुंबईत तीन नवीन प्रकरणे आढळल्यानंतर, येथे विकेंडला कलम 144 लागू करण्यात आले आहे. याअंतर्गत राजकीय सभा, कार्यक्रम घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे.