Indurikar Maharaj: इंदुरीकर महाराज यांना वादग्रस्त वक्तव्य भोवले; खंडपीठाचा निर्णय, गुन्हा दाखल होण्याची शक्यता
मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) दिलेल्या निर्णयामुळे हा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आणि परिचित असलेल्या हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) दिलेल्या निर्णयामुळे हा मार्ग मोकळा झाला आहे. इंदुरीकर महाराज यांनी पुत्र प्राप्तीबाबत आपल्या कीर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुनच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत होती. दरम्यान, हे प्रकरण मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात पोहोचले. खंडपीठाने प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल कायम ठेवल्याने आता गुन्हा दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
इंदुरीकर महाराज यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी शिर्डीतील ओझर येथे कीर्तनादरम्यान केलेल्या निरुपणात 'सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते', असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच, इंदुरीकर महाराज यांचे कीर्तनातील हे विधान म्हणजे समाजप्रबोधन अथवा सामान्य विधान नव्हे. तर ती चक्क गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे. हे वक्तव्य म्हणजे PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चे उल्लंघन आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करण्यात आली होती. (हेही वाचा, Indurikar Maharaj on YouTubers: माझ्या भाषणाचे व्हिडिओ अपलोड करून पैसे कमावणाऱ्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील; इंदुरीकर महाराजांचा यूट्यूबर्संना शाप)
दरम्यान, PCPNDT सल्लागार समितीने प्राप्त तक्रारीवरुन निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना नोटीस पाठवली होती. या नोटीशीद्वारे इंदुरीकर महाराज यांच्याकडे खुलासाही मागविण्यात आला होता. दरम्यानच्या काळात इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करावा यासाठी प्रथम वर्ग न्यायालयात 156 (3) याचिका करण्यात आली होती. मात्र, सत्र न्यायालयाने इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश रद्द केला होता. याचिकाकर्त्याने या निर्णयाविरोधात औरंगाबादच्या खंडपीठात आव्हान दिले होते. याचिकाकर्त्याच्या अर्जावर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. ज्यात खंडपीठाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवत प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. परिणामी इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.
काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज? वाचा जसंच्या तसं
येथे दुहेरी अवतरण चिन्हात दिलेली विधाने निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी शिर्डी येथील ओझर येथे कीर्तानावेळी उच्चारलेली असल्याचा दावा केला जातो आहे. ही विधाने करतानाचा इंदुरीकर महाराज यांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर आणि युट्यूबवर व्हायरल झाला होता. लेटेस्टली मराठी या विधानाची अथवा व्हिडिओची पुष्टी करत नाही. केवळ वाचकांच्या माहितीसाठी ही विधाने येथे देत आहोत. लेटेस्टली मराठी या विधानाचे समर्थन अथवा विरोध करत नाही. ''स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब, असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्षपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला''