Nisarga Cyclone: निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सरकार सज्ज; 'अशी' केली आहे तयारी, वाचा सविस्तर
महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयांच्ये ट्विटर अकाउंट (CMO) वरून सरकारतर्फे निसर्ग चक्रीवादळाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या खबरदारी उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे
महाराष्ट्रासह (Maharashtra) गुजरात (Gujrat) राज्यावर असलेलं 'निसर्ग चक्रीवादळा'चं (Cyclone Nisarga) संकट 3 जून पर्यंत किनारपट्टीवर धडक देईल अशी शक्यता आहे. या वादळाच्या संभाव्य धोक्याला लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) तर्फे सर्व प्रकारची तयारी करण्यात आली आहे. नागरिकांना याबाबत सतर्क करण्यापासून ते अधिक धोका असणाऱ्या भागात एनडीआरएफच्या (NDRF) तुकड्या सज्ज ठेवण्यापर्यंत सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात आली आहे असे सध्या तरी सरकारकडून सांगण्यात येत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज भारताच्या पश्चिम किनारपट्टीसाठी धोकादायक असणार्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. नुकतीच महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयांच्ये ट्विटर अकाउंट (CMO) वरून सरकारतर्फे करण्यात आलेल्या खबरदारी उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे.. हे देखील वाचा- Nisarga Cyclone: चक्रीवादळात नागरिकांनी काय विशेष काळजी घ्यावी, वाचा सविस्तर
CMO ट्विटर अकाउंट वरून प्राप्त माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळाला रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना खालील प्रमाणे:
- मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
-वादळास तोंड देण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे.
-मच्छिमारांनाही समुद्रातून बोलावून घेण्यात आले.
- राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्याही तयार ठेवण्यात आल्या आहेत.
-कच्च्या घरांत राहत आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहे. यासाठी पक्की निवारा गृहे देखील तयार ठेवण्यात आली आहेत.
-मुंबई महानगर क्षेत्रातील विशेषत: सखल भागातील झोपडपट्टीवासियांना देखील स्थलांतरित करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
-मदत व बचाव कार्य करताना कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच नॉनकोविड रुग्णालये उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.
- वीज पुरवठा खंडीत होणार नाही तसेच पालघर आणि रायगड मधील रासायनिक कारखाने, अणू ऊर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे.
-लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या वादळाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हीसीद्वारे चर्चा करून या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. अलिबाग येथे ही 3 जूनला दुपारच्या वेळी 100-110 kmph वेगाने चक्रीवादळ जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत माहिती ओळखूनच विश्वास ठेवा अफावणा बळी पडून घाबरून जाऊ नका.