'देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करणार'; निलेश राणेंच्या इशाऱ्यानंतर उदय सामंत झाले आक्रमक
त्यामुळे कार्यकर्ता म्हणून राजापूर आणि रत्नागिरी विधानसभा आमच्याकडे यावेत, अशी मागणी निलेश राणेंनी केली आहे.
लोकसभेमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये रत्नागिरी मधून अपेक्षित लीड न मिळाल्याचं सांगत निलेश राणे यांनी उदय सामंत यांच्यावर योग्य काम न केल्याचा दावा केला आहे. यानंतर आमदार नितेश राणे यांनी रत्नागिरी मतदारसंघावर दावा करत हा मतदारसंघ आपल्याला मिळावा अशी मागणी केल्याचं समोर येताच उदय सामंत आक्रमक झाले आहेत. उदय सामंत यांनी निलेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे. उदय सामंत यांच्या मतदारसंघात नारायण राणे यांना कमी मतं मिळाली असं सांगत राणे कधीही माफ करत नाहीत असा थेट इशारा निलेश राणे यांनी दिला होता. यावरून आता उदय सामंतही आक्रमक झाले आहेत.
माझा मतदारसंघ भाजपसाठी मागणे किंवा माझ्यावर आक्षेप घेणे याबाबत आपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहे. फडणवीस यांनी देखील गृहमंत्रालयाच्या माध्यमातून याबाबतीत माहिती घेतली पाहिजे. असे उदय सामंत म्हणाले आहेत. उदय सामंत प्रचारात कमी पडले असतील तर ते सुद्धा दाखवून द्या असं आव्हान त्यांनी दिलं आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ आहे. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून राजापूर आणि रत्नागिरी विधानसभा आमच्याकडे यावेत, अशी मागणी निलेश राणेंनी केली आहे. यावेळी त्यांनी किरण सामंत हे उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान लोकशाहीमध्ये कोणीही कुठलाही मतदारसंघ मागू शकतो. पण निर्णय नेतेमंडळी घेत असतात. मी महायुतीतला एक जबाबदार मंत्री आहे, त्यामुळे मला यातून वाद वाढवायचा नाही. त्यांच्या मताचा मी आदर करतो, असं म्हणत उदय सामंत यांनी निलेश राणेंना प्रत्युत्तर दिलं. होतं.