Sharad Pawar On Eknath Khadse: एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार? शरद पवार काय म्हणाले पाहा

मी उद्या दिल्लीला जाणार आहे. तसेच, खडसे यांनी भेटीबाबत कोणतीही विनंतीही केली नाही. त्यामुळे आज अशी कोणतीही भेट होणार नसल्याचे, शरद पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar, Eknath Khadse | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) लवकरच पक्षांतर करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) जाणार असे वृत्त प्रसारमाध्यमांतून वारंवार झळकत असते. स्वत: एकनाथ खडसे यांनी आपण भाजप (BJP) सोडणार नसल्याचे या आधिच स्पष्ट केले आहे. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. एकनाथ खडसे हे आज मुंबईला येणार असून, ते शरद पवार यांची भेट घेणार असे वृत्त होते. याबाबत विचारले असता पवार यांनी असा कोणताही कार्यक्रम ठरला नसल्याचे म्हटले आहे. दरम्यना, एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार किंवा नाही, याबाबत पवार यांनी कोणतेही भाष्य केले नाही.

एकनाथ खडसे आज शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांना भेटणार असे वृत्त होते. याबबत विचारले असता एकनाथ खडसे यांच्यासोबत भेटीचा कोणताही कार्यक्रम ठरला नाही. मी उद्या दिल्लीला जाणार आहे. तसेच, खडसे यांनी भेटीबाबत कोणतीही विनंतीही केली नाही. त्यामुळे आज अशी कोणतीही भेट होणार नसल्याचे, शरद पवार यांनी सांगितले. शरद पवार यांनी न्यूज 18 सोबत बोलताना ही माहिती दिली. (हेही वाचा, Eknath Khadse: एकनाथ खडसे पक्ष सोडणार? भाजप राष्ट्रीय कार्यकारणीतून पुन्हा डावलल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण)

दुसऱ्या बाजूला एकनाथ खडसे यांनीही खुलासा केला आहे. खडसे यांनी म्हटले आहे की, आपण वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईला आलो आहोत. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी आपण भाजप सोडणार नाही. तसेच, इतर पक्षात प्रवेश करणार नाही, असे या आधीच स्पष्ट करत पक्षांतराचे वृत्त फेटाळून लावले आहे. (हेही वाचा, Eknath Khadse On Devendra Fadnavis: 'पक्षाने ऐकले नाही म्हणूनच जनतेच्या दरबारात बोलावे लागले' एकनाथ खडसे यांचे देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर)

दरम्यान, प्रसारमाध्यमांतून काही दिवसांपूर्वीच वृत्त आले होते की, शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एका बैठकीत एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देण्याबाबत चर्चा झाली. ही बैठक 23 सप्टेंबरला पार पडली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याबाबतचे वृत्त फेटाळूलावत हा विषयच आपल्याला माहिती नाही. ज्यांनी या विषयावर चर्चा सुरु केली त्यांनाच आपण याबाबत अधिक विचारा, असे खडसे यांनी म्हटले होते.