आमदार जितेंद्र आव्हाड 'मातोश्री'वर; उद्धव ठाकरेंसोबत पाऊण तास चर्चा
या बैठकीपूर्वीच आव्हाड यांनी 'मातोश्री'वर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज (शुक्रवार, १२ ऑक्टोबर) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. आव्हाड हे कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी ठाकरे यांची 'मातोश्री' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आव्हाड हे राष्ट्रवादीचे आक्रमक आमदार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी शिवसेनेवर तीव्र शब्दांत अनेकदा टीका केली आहे. तसेच, शिवसेनेनेही मुखपत्र 'सामना'तून आव्हाड यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यामुळे या भेटीमागचे नेमके कारण काय? याबाबत राजकीय वर्तुळातून उत्सुकता व्यक्त होत आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात सुमारे पाऊण तास चर्चा झाली. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन या भेटीची माहिती दिली. मात्र, त्यांनी भेटीदरम्यान काय चर्चा झाली याचा तपशील सांगितला नाही. शिवसेनेकडूनही या भेटीबाबतचा तपशील बाहेर आला नाही. दरम्यान, या भेटीबाबत प्रसारमाध्यमांनी आव्हाड यांनाच विचारले असता, ' दोन वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती भेटू शकत नाहीत काय?', असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. तसेच, 'वाऱ्याची दिशा सांगता येते, राजकारणाची नाही' असे सूचक विधानही करत विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आज मुंबईत पार पडत आहे. या बैठकीपूर्वीच आव्हाड यांनी 'मातोश्री'वर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली. आव्हाड हे शरद पवार यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. राज्यातील सध्याचे राजकारण पाहता भाजपला रोखण्यासाठी विरोधक जोरदार सक्रीय झाले आहेत. अर्थात, काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादीची बोलणी सुरुच आहेत. पण, शिवसेनेसोबत राष्ट्रवादीची काही वेगळे गणीत सुरु आहे का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, भाजपच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे, अशी भूमिका शरद पवार यांनी अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. पवारांच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे-आव्हाड भेट महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, स्वत: आव्हाड यांनी मात्र ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतल्याचे म्हटले आहे. मात्र, या भेटीचे राजकीय अर्थ काढले गेले नाहीत तरच आश्चर्य.