'आता मुंबईकरांनी गाड्या जाळायच्या की चालवायच्या?' इंधन दर वाढीवरुन जितेंद्र आव्हाड यांचा अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा
अक्षय कुमार नंतर त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे.
कोविड-19 (Covid-19) लॉकडाऊननंतर (Lockdown) पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. आज सलग 20 व्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. लॉकडाऊनमुळे आधीच मुंबईकरांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यात इंधन दरवाढीचा सामना त्यांना करावा लागत आहे. दरम्यान यापूर्वी 24 मे 2012 रोजी महानायक अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांनी इंधन दरवाढीवर ट्विट केले होते. "पंपवरील सेवक विचारतो- कितीचे पेट्रोल टाकू? त्यावर मुंबईकर म्हणतो- 2-4 रुपयांचे कारवर शिंपड, जाळून टाकतो." असे ट्विट बिग बींनी केले होते. त्यावरुन आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Leader Jitendra Awhad) यांनी अक्षय कुमार नंतर अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे. 'आता मुंबईकरांनी गाड्या जाळायच्या की चालवायच्या?' असा सवाल त्यांनी बिग बींना केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये लिहिले, "तुम्ही पेट्रोल पंपवर जावून पेट्रोल भरले नाही? का तुम्ही बिल पाहिले नाही? ही बोलण्याची वेळ आहे. तुम्ही तरी पक्षपातीपणा करणार नाही, अशी आशा आहे. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. आता मुंबईकरांनी गाड्या जाळायच्या की चालवायच्या." या ट्विटमध्ये अमिताभ बच्चन यांना टॅग करण्यात आले आहे. ('आता तू गाड्या वापरणं बंद केलंस की ट्विटर?' अक्षय कुमार याने इंधन दरवाढीवरुन 9 वर्षांपूर्वी केलेल्या ट्विटवर जितेंद्र आव्हाड यांचा सवाल)
Jitendra Awhad Tweet:
यापूर्वी इंधन दरवाढीवर अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र सध्या होत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर सर्वांनी मौन पाळल्याने जितेंद्र आव्हाड संतापले आहेत आणि त्यांनी यापूर्वी ट्विट करणाऱ्या कलाकारांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. दरम्यान आज मुंबईत पेट्रोलचे दर 86.89 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर 78.49 रुपये प्रति लीटर इतके आहेत.