Navneet Rana Challenge to CM: नवनीत राणा यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुले आव्हान; मातोश्रीबाहेर वाचणार हनुमान चालीसा

आज जर उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा वाचली नाही तर मी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचेन, असं आव्हान नवनीत राणा यांनी दिलं आहे.

Navneet Kaur Rana (Photo Credit: ANI)

Navneet Rana Challenge to CM: अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Minister Uddhav Thackeray) यांना खुले आव्हान दिले आहे. मातोश्रीवर (Matoshree) जाऊन हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाचणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मला रोखण्यासाठी त्यांनी सर्व शक्ती पणाला लावावी आणि थांबवून दाखवावे. आज जर उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा वाचली नाही तर मी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचेन, असं आव्हान नवनीत राणा यांनी दिलं आहे.

नवनीत राणा पुढे म्हणाल्या की, उद्धव ठाकरेंना भीती आहे की त्यांनी हनुमान चालीसा वाचली तर महाविकास आघाडीतून एकच पक्ष बाहेर पडेल. आज अमरावती येथील नवनीत राणा यांच्या घरी हनुमान चालिसाचे आयोजन करण्यात आले आहे. नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाऊन हनुमान चालीसा वाचण्याचे आव्हान दिल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत. मातोश्रीबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले आहेत. शिवसैनिक नवनीत राणा यांच्या विरोधात घोषणा देत आहेत. (हेही वाचा - Raj Thackeray in Pune: हनुमान जयंती निमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुणे येथे महाआरती)

हिंदुत्वाच्या विचारातून शिवसेनेचा जन्म -

नवनीत राणा म्हणाल्या की, 'काल शिवसेनेचे तीन-चार लोक माझ्या घराबाहेर आले. त्यांनी आधी सांगितले असते तर मी त्याच्यासाठी चांगली व्यवस्था केली असती. मी येथील खासदार आहे. त्यांची चहा पिण्याची आणि बसण्यासाठी चांगली व्यवस्था मी केली असती. मला एक प्रश्न पडला आहे. मी हनुमान चालीसा वाचते हे संपूर्ण देशाला माहीत आहे. माझा प्रश्न उद्धव ठाकरेंना आहे. ज्या हिंदुत्वावर शिवसेनेचा जन्म झाला आणि ज्या हिंदुत्वासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केले, तो विचार आज मातोश्रीवर जिवंत आहे की नाही?

मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचणार -

नवनीत राणा यांनी पुढे बोलताना सांगितलं की, 'आज हनुमान जयंतीला ते (उद्धव ठाकरे) हनुमान चालीसा वाचतील की नाही? हा माझा प्रश्न आहे. त्यांनी हनुमान चालीसा वाचली तर त्याचे विचार बदलले आहेत की नाही हे संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना दिसेल. महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांकडून त्यांच्यावर दबाव आहे का? त्यांनी हनुमान चालीसा वाचली तर महाविकास आघाडीतून एखादा पक्ष बाहेर पडेल, असं तर नाही ना? असा सवालही नवनीत राणा यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंना पदाची लालूच लागली आहे का? मी मुंबईची मुलगी आहे. माझ्यामागे विदर्भाची ताकद आहे. मला मुंबईला जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यांनी (उद्धव ठाकरे) हनुमान चालीसा वाचली नसेल तर मी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचेन. त्यांनी मला तारीख सांगावी आणि आपली संपूर्ण सरकारी यंत्रणा लावावी आणि मला रोखवून दाखवावे, असं खुल आव्हानही नवनीत राणा यांनी केलं आहे.