Navi Mumbai: आजपासून सुरु होणार NAINA मधील गृहनिर्माण प्रकल्पासाठी ऑनलाइन नोंदणी; जाणून कुठे कराल अर्ज
गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर शहर व औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) नैनामध्ये घरबांधणी योजना उपलब्ध करून दिली आहे.
नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रात (NAINA) एकूण 171 सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी आजपासून सुरू होणार आहे. या 171 पैकी- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) 07 सदनिका आणि अल्प उत्पन्न गटांसाठी (LIG) 164 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नैनामध्ये प्रथमच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांच्यासाठी घरे उपलब्ध करून दिली जात आहेत.
या घरांसाठी ऑनलाइन नोंदणी 29 सप्टेंबर 2023 पर्यंत सुरू राहील. सर्व प्रक्रियेचे पालन केल्यानंतर, 08 नोव्हेंबर 2023 रोजी सिडको भवन येथे या योजनेसाठी संगणकीकृत सोडत काढण्यात येईल.
इच्छुक अर्जदार lottery.cidcoindia.com या वेबसाइटला भेट देऊन गृहनिर्माण योजनेत सहभागी होऊ शकतात. तसेच या योजनेची माहिती सिडकोच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरूनही उपलब्ध करून दिली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर शहर व औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) नैनामध्ये घरबांधणी योजना उपलब्ध करून दिली आहे.
नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र प्रकल्पाच्या डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन (DCPR) अंतर्गत, 4000 sqm किंवा त्याहून अधिक आकाराच्या भूखंडांवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाची घरे समावेशी गृहनिर्माण योजनेअंतर्गत विकसित करण्याची तरतूद आहे. त्यानुसार, भूखंडाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 20% भूखंड NAINA प्रकल्प क्षेत्रामध्ये या दोन गटांच्या सदनिकांसाठी खाजगी विकासकांमार्फत उपलब्ध करून देण्यात आला आहे. (हेही वाचा: PM Narendra Modi On Women's Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर होणे भारताच्या संसदीय प्रवासाचा सुवर्ण क्षण- पंतप्रधान नरेंद्र मोदी)
या तरतुदीनुसार, एकूण सात विकासकांनी संबंधित प्रकल्पांसाठी भोगवटा प्रमाणपत्र (Occupancy Certificate) प्राप्त केल्यानंतर सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत उपलब्ध सदनिकांचा तपशील सिडकोकडे सादर केला आहे. त्यानुसार सिडको अशा सदनिकांसाठी पात्र उमेदवारांची लॉटरी काढून निवड करण्याची सोय करत आहे. या सोडतीनंतर पात्र उमेदवारांच्या नावांची यादी सिडकोकडून संबंधित विकासकांना कळवली जाईल.