Navi Mumbai: खोट्या सोन्याच्या दागिन्यांवर बँकेकडून 40 लाखांचे कर्ज मिळवणाऱ्या चौघांना खारघर पोलिसांकडून बेड्या
बनावट सोन्याच्या दागिन्यांच्या आधारे बँकेकडून 40 लाखांचे सोनं घेणाऱ्या चारजणांना खारघर पोलिसांनी अटक केली आहे.
बनावट सोन्याच्या दागिन्यांच्या (Fake Gold Ornament) आधारे बँकेकडून 40 लाखांचे कर्ज घेणाऱ्या चारजणांना खारघर पोलिसांनी (Kharghar Police) अटक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, यात नेरुळ(Nerul) मधील एक ज्वेलर असून अन्य तिघांचे बँकेत अकाऊंट आहे. सॅवियो मार्टिन (45), भरत राजावत (50), परशुराम देवरुखकर (45) आणि सुनील फराटे (47) अशी या अटक झालेल्या चौघांची नावे आहेत.
यातील राजावत या ज्वेलरने दागिन्यांची चुकीची किंमत सांगितली. त्यानंतर या प्रकरणातील सूत्रधाराने या दागिन्यांच्या आधारे बॅंकेतून कर्ज काढण्याचा सल्ला इतर तिघांना दिला. बँकेत अकाऊंट असलेल्या तिघांनी एकूण 40 लाखांचे कर्ज घेण्यास बँकेत अर्ज दाखल केला. या तिघांना बँकेतून कर्ज काढण्यासाठी प्रत्येकी दीड लाख रुपयांचे कमिशन राजावत ज्वेलरने दिले. या प्रत्येक अकाऊंट होल्डरने बँकेतून 5 लाख रुपयांचे कर्ज मिळवले. (Marathe Jewellers च्या कौस्तुभ मराठेंना पुण्यात अटक; फसवणूकीचा आरोप)
बँकेत सोने जमा झाल्यानंतर या सोन्याची तपासणी केली जाते आणि त्यानंतर त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ठरवली जाते. मात्र या प्रकरणात तपासणी दरम्यान सोने बनावट असल्याचे बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात कसे आले नाही? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या सर्व घोटाळ्यामध्ये बँकेचा कोणता कर्मचारी देखील सहभागी आहे, हे तपासणे गरजेचे आहे, अशी माहिती नवी मुंबईच्या झोन 2 चे डिसीपी शिवराज पाटील यांनी दिली.
दरम्यान, अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी मुंबईमधील भाईंदर येथे घडली होती. खोटे सोन्याचे दागिने विकून एका दाम्पत्याने ज्वेलर्सकडून 40,000 रुपये उकळले. 14 ग्रॅम वजनाचे कानातले आणि अंगठ्या गहाण ठेवून या दाम्पत्याने 40,000 रुपये घेतले. यासाठी त्यांनी विदर्भातील एका ज्वेलर शॉपची खोटी पावती देखील दाखवली. याप्रकरणी भाईंदर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.