Lok Sabha Election 2024: नाशिकची जागा आपल्यालाच हवी, भाजपच्या कार्यकर्त्यांची मंत्री महाजनांकडे मागणी

यात नाशिकच्या जागेबाबत खासदार शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांचे नाव परस्पर जाहीर केल्याने नाराजी व्यक्त केली.

Hemant Godse | Twitter

नाशिकच्या लोकसभा मतदार संघासाठी (Nashik Lok Sabha Election) शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी थेट उमेदवाराची घोषणा केल्याने आक्रमक झालेल्या भाजपच्या आमदारांसह पक्ष पदाधिकाऱ्यांनी या जागेसाठी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडे मागणी केली आहे.  जागा शिवसेनेकडे जाणार असली तरी त्यांना परिस्थिती अनुकूल नसल्याचे सांगत पदाधिकाऱ्यांनी ही जागा भाजपकडे घेण्याचा हट्टच मंत्री महाजन यांच्याकडे धरला. त्या वेळी मंत्री महाजन यांनी मुंबईत वरिष्ठांशी बोलून मार्ग काढणार असल्याचे सांगितले.  (हेही वाचा - Lok Sabha Elections 2024: अजित पवार गटाला मोठा धक्का; आमदार निलेश लंके शरद पवारांच्या भेटीला (Video))

नाशिक लोकसभा मतदारसंघात गोडसे यांच्या विरोधात वातावरण असून, अनेक सर्वेक्षणातून हे पुढे आले आहे. यात नाशिकच्या जागेबाबत खासदार शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांचे नाव परस्पर जाहीर केल्याने नाराजी व्यक्त केली. त्यांची उमेदवारी झाल्यास महायुतीला फटका बसण्याची शक्यता आमदारांनी व्यक्त केली. त्यामुळे भाजपने ही जागा आपल्याकडे घेऊन उमेदवार द्यावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर मंत्री महाजन यांनी पदाधिकारी व आमदारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

गोडसेंच्या उमेदवारीची घोषणा यावरून नाशिकची जागा शिवसेनेला सुटणार असल्याचे जवळपास निश्‍चित मानले जात असले तरी उमेदवार कोण, याविषयी अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सांगत उमेदवारीचा ‘सस्पेन्स’मंत्री गिरीश महाजन यांनी कायम ठेवला आहे.  नाशिक लोकसभेत शिवसेनेचाच उमेदवार राहणार असला तरी उमेदवार कोण राहील, याविषयी अद्याप स्पष्टता नसल्याचे सांगत त्यांनी खासदार हेमंत गोडसेंच्या उमेदवारीचा मार्ग पूर्णत: मोकळा झालेला नसल्याचे जणू संकेतच दिले.