नाशिक: पहाटे व्यायामासाठी बाहेर पडलेल्या 12 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला; जागीच मृत्यू

ऊसाच्या शेताजवळ धावाताना त्यांना समोर बिबट्या दिसला. दोघांनी बिबट्याला पाहून पळ काढला पण एकावर हल्ला करत बिबट्याने त्याने शेतात खेचत नेले. दरम्यान या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

Leopard | Representational image (Photo credits: Wikimedia Commons)

नाशिकमध्ये आज सकाळच्या सुमारास शेतमळे भागात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या 12 वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला असून बिबट्याला पकडण्यासाठी तात्काळ वन विभागाकडून पिंजरा लावण्याचं काम सुरू केलं असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार, नाशिकच्या एकलहरे मधील हिंगणवेढे गावात सकाळी 5.30 च्या सुमारास तीन जण व्यायामासाठी रोजच्या सवयीप्रमाणे बाहेर पडले. ऊसाच्या शेताजवळ धावाताना त्यांना समोर बिबट्या दिसला. दोघांनी बिबट्याला पाहून पळ काढला पण एकावर हल्ला करत बिबट्याने त्याने शेतात खेचत नेले. दरम्यान या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

बिबट्या यापूर्वी गावामध्ये कुणी पाहिल्याची माहिती नव्हती. मात्र आजच्या दुर्देवी घटनेनंतर त्वरित शेतपरिसरामध्ये पिंजरा लावण्यात आला असून गस्ती पथकाला तेथेच थांबण्याचे आदेश दिल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी मटाशी बोलताना सांगितले आहे.

दरम्यान सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आहे. नागरिकांना सक्तीने घरातच बसण्याचे आदेश आहेत. सोबतच वाहनांची रहदारी कमी झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी वन्य जीव रस्त्यावर फिरत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.