Nashik Lasalgaon APMC: लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीने बदलला 75 वर्षांचा पायंडा; अमावस्येलाही होणार धान्य, कांदा लिलाव
देशभर आणि विदेशातही अनेक ठिकाणी नाशिकचा कांदा प्रसिद्ध आहे. त्यामुळे देशभरातील व्यापारी कांद्याच्या खरेदीसाठी लासलगावला हजेरी लावतात. कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
नाशिक (Nashik ) जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव ( Lasalgaon Agriculture Produce Market Committee ) पहिल्यांदाच गेल्या 75 वर्षांचा पायंडा मोडत आहे. गेल्या 75 वर्षांतील अलिखीत नियम अथवा परंपरेला छेद देत लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समिती (Nashik Lasalgaon APMC पहिल्यांदाच अमावस्येच्या (Amavasya ) दिवशी कांदा लिलाव कायम ठेवणार आहे. गेली 75 वर्षे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अमावस्या असलेल्या दिवशी कांदा, धान्य लिलाव (Onion Auction) कटाक्षाने टाळत होते. हा नियम अथवा परंपरा कुणी आणि का बनवली याबाबत विशेष कोणालाच माहिती नाही. तरीही ही परंपरा नेहमी पाळली जात असे. प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिल्यानंतर बाजार समितीने नियम बदलण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
अशिया खंडातील कांद्याची मोठी बाजारपेठ अशी लासलगावची ओळख आहे. देशभर आणि विदेशातही अनेक ठिकाणी नाशिकचा कांदा प्रसिद्ध आहे. त्यामुळे देशभरातील व्यापारी कांद्याच्या खरेदीसाठी लासलगावला हजेरी लावतात. कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. अशी ही जगप्रसिद्ध बाजारसमिती 1 एप्रिल 1947 मध्ये स्थापन करण्यात आली. बाजार समिती अस्तित्वात आल्यापासून आजतागायत लासलगाव बाजार समितीत आमावस्येच्या दिवसी कांदा किंवा धान्याचे लिलाव घेतले जात नव्हते. हे लिलाव बंद ठेवले जात होते. (हेही वाचा, कांदा चिरताना डोळ्यातून पाणी का येते माहितेय? जाणून घ्या कारण)
दरम्यान, ही परंपरा का सुरु झाली. कोणी सुरु केली याबाबत मात्र विशेष कुणाला माहिती नाही. तरीही आमावस्येला कांदा आणि धान्य लिलाव बंद ठेवले जात असत. टीव्ही नाईनने याबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान, आता समितीने सकारात्मक निर्णय घेतला आहे. आमावस्येदिवशीही कांदा, धान्य असे लिलाव होणार आहेत.
लासलगाव बाजार समिती ही जगप्रसिद्ध आहे. या बाजार समितीतून फ्रान्स ,केनिया, कॅनडा, स्पेन, युनायटेड स्टेटस्, ओमान, व्हियेतनाम, सोशल रिपब्लिक, मालदीव, युनायटेड किंगडम, बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, संयुक्त अरब, अमिराती, नेपाळ, सिंगापूर,इंडोनेशिया, कतार, कुवेत, मोरिशस, सौदी अरेबिया, बेहरीन, रियुनियन, रशिया, ग्रीस, हाँगकाँग, थायलंड, ब्रुनेई, पाकिस्तान, इटली, नेदरलँड्स, सेशल्स, कोमोरेझ यांसह सुमारे 76 देशांमध्ये कांदा निर्यात होते.