नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, 2 ऑक्टोबर रोजी हाती घेणार कमलपुष्प
यासोबतच महाराष्ट्र्र स्वाभिमानी पक्षाचे भाजपात विलीनीकरण देखील याच दिवशी करण्यात येणार आहे.
नारायण राणे (Narayan Rane) यांच्या भाजपा (BJP) प्रवेशाचा मुहूर्त ठरला असून, 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या (Mahatma Gandhi Birth Anniversary) च्या दिवशी नितेश राणे (Nitesh Rane) व निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यासह ते कमलपुष्प हाती घेणार असल्याचे वृत्त सध्या समोर येत आहे. यासोबतच महाराष्ट्र्र स्वाभिमानी पक्षाचे (Mahrashtra Swabhimani Paksh) भाजपात विलीनीकरण देखील याच दिवशी करण्यात येणार आहे. चर्चगेट येथील गरवारे हॉल मध्ये 2ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4 वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यापूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2019) पार्श्वभूमीवर सुरु असणाऱ्या मुख्यमंत्री महाजानदेश यात्रेत सुद्धा नारायण राणे यांनी आपल्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना दुजोरा दिला होता. शिवसेना आणि भाजपा यांच्यात काहीही ठरलं तरी आपण मात्र आपल्या पक्षासह भाजपात प्रवेश घेणार आहोत असे ठाम वक्तव्य राणे यांनी केले होते.
नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरु होताच भाजपाचा मित्र पक्ष शिवसेनेचे काय मत असेल याबाबत सर्वत्र कुतुहूल होते, तसेच युतीची घोषणा झल्यावर नारायण राणे यांचा पप्रवेश होणार का याबाबतही अनेक प्रश्न सातत्याने समोर येत होते. मात्र आता राणेंच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्यावर या चर्चांना विराम मिळाला आहे. मात्र तरीही अद्याप युतीची घोषणा आणि जागावाटप जाहीर न झाल्याने शिवसेनेची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, महाजानदेश यात्रेचे सिंधुदुर्गात स्वागत करत असताना नारायण राणे यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या होत्या. शिवसेना आणि भाजपा मध्ये वाद असू शकतात पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असल्याने शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्नच येत नाही तसेच आपण भाजपात गेल्याने त्यांचे पारडे जड होणार आहे असा गौप्य्स्फोट राणे यांनी केला होता. असं असलं तरी येत्या विधानसभेत आपण निवडणूक लढवणार नसलो तरी, नितेश राणे यांच्यासह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते भाजपाच्या बाजूनेच निवडणूकीच्या मैदानात उतरणार असल्याचे देखील राणे यांनी स्पष्ट केले आहे.