'कोकणातील हप्तेखोरांची नावं उद्याच्या सभेत जाहीर करणार'; चिपी विमानतळ उद्घाटनापूर्वी नारायण राणे यांचा शिवसेनेवर निशाणा
उद्या चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी जाहीर सभेमध्ये शिवसेनेच्या नेत्यांबद्दल मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशारा केंद्रीय सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे.
शिवसेना (ShivSena) विरुद्ध नारायण राणे (Narayan Rane) हे समीकरण सर्वश्रूत आहे. शिवसेनेवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला आपल्या टीकेचे लक्ष्य केले आहे. उद्या चिपी विमानतळाच्या उद्घाटन (Chipi Airport Inauguration) प्रसंगी जाहीर सभेमध्ये शिवसेनेच्या नेत्यांबद्दल गौप्यस्फोट करण्याचा इशारा केंद्रीय सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. एबीपी माझा शी बोलताना त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. "कोकणात शिवसेनेची हप्तेबाजी सुरु आहे. या हप्तेखोरांची नावं मी उद्याच्या सभेत जाहीर करणार आहे," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. उद्या वास्तववादी चित्र कोकणवासियांसमोर येणार असल्याचंही ते म्हणाले.
नारायण राणे म्हणाले की, "1997-98 साली मी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला. तेव्हापासून पर्यटन वाढवण्यासाठी आणि जिल्ह्याची आर्थिक प्रगती व्हायची असेल तर तिथे विमानतळ व्हायला हवं, अशी माझी इच्छा होती. त्यादृष्टीने मी प्रयत्न करत असताना प्रफुल्ल पटेल यांनी ग्रीनफिल्ड विमानतळाला परवानगी दिली. 15 ऑगस्ट 2009 साली या विमानतळाचं भूमीपूजन मी आणि सुरेश प्रभू यांनी केलं. तेव्हापासून विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली. त्यावेळेस विमानतळ नको म्हणून विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. तरीही काम सुरुच होतं. मध्यतरीच्या काळात आलेल्या सरकारने त्याकडे लक्ष दिलं नाही." (Chipi Airport: चिपी विमानतळ उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर; दोघांच्याही भाषणाबाबत उत्सुकता)
"2014 साली विमानतळ बांधून झाल्यावर केवळ तीन गोष्टी बाकी होत्या. पाणीपुरवठा, महामार्गापासून विमानतळापर्यंत येणारा चौपदरी रस्ता आणि वीज. मात्र इतक्या वर्षात त्याही केल्या नाहीत. जाणीवपूर्वक सिंधुदूर्गकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आता विरोध करणारे श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहेत," असंही ते म्हणाले.
"विमानतळाच्या उद्घाटनासाठी शिवसेना रोज तारखा जाहीर करत होती. पण त्यांना कोणी विचारत नव्हतं. शेवटी मी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे जावून परवानगी मिळवली. नुसतं कावकाव करुन काही होत नाही. बुद्धीने कामं करावी लागतात," असा टोलाही त्यांनी लगावला.
पुढे शिवसेनेवर निशाणा साधताना ते म्हणाले की, "सिंधुदुर्गातील उद्योजकांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रचंड त्रास आहे. रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम करण्यासाठी सुद्धा त्यांची अडवणूक करण्यात आली होती. शिवसैनिकांनी अधिक गाड्या घेतल्या आणि मगच रस्त्याचे काम सुरु करु दिलं."
दरम्यान, चिपी विमानतळाच्या निमित्ताने स्वप्नपूर्तीचा आनंदही त्यांनी बोलताना व्यक्त केला. "पर्यटनाला पोषक असं विमानतळ तयार झालं आहे. मी भूमिपूजन केलेल्या आणि बांधलेल्या विमानतळाचं उद्या उद्घाटन होत आहे, याचा मला आनंद आणि समाधान आहे," अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. "यातून पर्यटनाला चालना मिळेल, सिंधुदूर्गची आर्थिक परिस्थिती सुधारुन वैभवशाली सिंधुदूर्ग तयार होईल," असंही ते म्हणाले.